करमाळ्याचा बदलता इतिहास

    सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका हा आर्थिकदृष्ट्या सक्षम जरी नसला तरी राजकारण शिक्षण, आरोग्य सुविधा, शेती क्रीडा ,सहकार ,उद्योग इत्यादी सोयी अगदी ब-या पैकी आहेत .

उजनी आणि कोळगाव धरण सीना नदीच्या आसपास असणाऱ्या शेतीचं क्षेत्र हे अगदी चांगल्या पद्धतीनं पाण्याखाली व्यापलेलं आहे. बाकीच्या शेतकऱ्यांचे मात्र पाण्याअभावी कष्टाच्या तुलनेत शेतीमाल पाहिजे तेवढा निघत नाही त्यांना हवा तसा भाव मिळत नाही‌.           

 ड्रीप पद्धतीनं केळी लागवड पेरू तसेच स्ट्रॉबेरी ची लागवड देखील शेतकऱ्यांनी केली आहे ‌

भुईमूग, गहू, बाजरी, कापूस ज्वारी ,ऊस इत्यादी पिकांसाठी पोषक असे हवामान आपल्याकडं आहे म्हणून हीच पिके इथे वारंवार घेतली जातात पण तरीही स्ट्रॉबेरीची लागवड करमाळ्यातील वांगी सारख्या भागात होते ही खरंच कौतुकास्पद अशी बाब ठरली आहे.

असे नवनवीन प्रयोग आपले बौध्दिक कौशल्य वापरून ही  नवी पिढी करते आहे तेव्हा ही प्रयोगशील शेती कुठंतरी नवा आशेचा किरण, नवी पहाट घेऊन येते आहे असेही वाटून जाते कैकदा.

करमाळा तालुक्याचा बदलता इतिहास या लेखामध्ये एक आवर्जून अशी नोंद करावीशी वाटते की करमाळा तालुक्यातील आता राजकारणाचे वारे ही थोडेफार बदलते आहे.

कारण नवी पिढी राजकारणात आपले पाय रोवत असल्यामुळे मतदार ही अशा नव्या पिढीला संधी देऊ पाहत आहे अशा नव्या पिढीचा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकडे असलेला कल नागरिकांनी मनापासून स्वीकारलेला आहे असं वाटू लागलं आहे.

शहराच्या वेगवेगळ्या स्तरावरील राजकारणात काही बदल घडू पाहत आहेत. नवी पिढी सत्तेचे सोपान चढण्यास उत्सुक आहे. ही  राजकारणाची बदलती स्थित्यंतरे हा नवा प्रवाह लोकशाहीच्या प्रक्रियेत नवा प्राण फुंकेल की  नाही? हा काळच ठरवेल ,पण महिला सुरक्षा, बेरोजगार, भ्रष्टाचार मुक्त भारत पहायचा असेल तर हा बदल खरच आवश्यक आहे.

 या नव्या पिढींसाठी म्हणावं वाटतं की नवे आहेत पण छावे आहेत.

नव्या पिढीचं राजकारणात एकवटणं म्हणजे राजकीय वर्तुळातील ही एक मांदियाळी ठरत आहे.नक्कीच!

आणि यामुळे असं वाटतं की समाजातील मूलभूत प्रश्नांना आता नक्की कोंब फुटतील.

गरिबांना न परवडणा-या वैद्यकीय सुविधेवर मात करण्यासाठी कॉटेज हॉस्पिटलची भव्य इमारत आणि तिथली सुविधा ही अनेक रुग्णांना लाभकारी ठरत आहे.

रुग्णांच्या सेवेसाठी असणारं भव्य उपजिल्हा रुग्णालय (कॉटेज हॉस्पीटल )तेथील सुविधा, तेथील उपलब्ध असणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तिथल्या सर्व सुविधांचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात घेत आहे ही बाब खरंच नोंदणीय आहे.

कोरोना काळात शिक्षणाची खरंच खूप वाताहत झाली होती. कोरोनाचा दुर्देवी काळ सोडला तर करमाळा सारख्या भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच सेमी इंग्रजी शाळांसह मराठी शाळेचा ही नावलौकिक अगदी मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. स्पर्धा परीक्षासह क्रीडा स्पर्धां वर खूप जास्त भर दिला जात आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासाकडं घरातून प्रोत्साहन तर मिळतेच आहे पण शाळांमधूनही खेळ, स्पर्धा परीक्षा, शास्त्रीय संगीत शास्त्रीय नृत्य ,अभिनय यावरही अगदी मुलांचा, पाल्यांचा कल ओढा दिसून येतो आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनासह मूल्य शिक्षणाद्वारे सामाजिक कर्तव्याची जाणीव पण शाळांमधून रुजवली जाते ही बाब देखील कौतुकास्पद आहे. शिक्षण हे परिवर्तनाचं प्रभावी माध्यम जरी असले तरी इंग्रजी भाषांसह स्थानिक भाषांवर पण प्रभुत्व हवं हा कल आज  करमाळा सारख्या शाळांमधून पाहायला मिळतो‌. हे अधोरेखित करायला निश्चितच आवडेल.

  सोलापूर जिल्हा आर्थिक दृष्ट्या कमकुवत, दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. करमाळा तालुक्यात पाहिजे तेवढी उद्योग उभारणी नसली तरी करमाळा हे नाव सैराट मुळे अगदी सर्वांना परिचित झालेलं आहे.

 प्रसार माध्यमांमुळे समाजमनावर बरचसं चांगलंही कोरण्याचा प्रयत्न केला जातो तो खरच एक चांगला प्रयत्न आहे. करमाळा सारख्या भागात अनेक कलाकार निर्माता, दिग्दर्शक तयार होऊ लागले आहेत. तालुक्याला एक नवीन ओळख यातून मिळते आहे. यापेक्षा आणखीन दुसरा आनंद काय असेल?

अभिमानानं सांगावसं वाटतं की करमाळा सारख्या तालुक्याला पोलीस अधिकारी ,तहसीलदार साहेब, बीडीओ साहेब अशी अशी अनेक प्रशासनिक अव्वल दर्जाची मान्यवर मंडळी लाभली आहे. त्यामुळे येथील सुविधांचा नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. सरकारी योजना या सर्वसामान्या पर्यंत पोहोचण्याचं काम ही  प्रसार माध्यमांद्वारे होत राहतं अशातच लाभार्थी वाढतात आणि शासकीय योजना या घरोघरी  पोहोचतात हे खरंच गौरवान्वीत आहे.

   बेरोजगार युवक व महिला  उद्योग उभारणीवर भर देत पुढे येत आहेत.त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी  सहकार क्षेत्राकडून काही मार्गदर्शन किंवा योजना या त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी

काहीतरी करु पाहणा-या बायांना त्यांच्यातील कला कौशल्याला वाव देण्यासाठी

काही सामाजिक,राजकीय क्षेत्रातील व्यक्तीं करमाळा तालुक्यात, खेडोपाड्यात पुढे सरसावत आहेत.माध्यम बनत आहेत.यामुळे ही करमाळ्याचा इतिहास बदलण्यास त्यांचा मोलाचा वाटा आहे.

तसं पाहिलं तर करमाळा हा भाग एक संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो.पण आज अनेक जातीधर्मातील सण ,उत्सव हे सगळे मिळून एकोप्यानं साजरे करतात. म्हणूनच वाटतं की खऱ्या अर्थानं हा एक ऐतिहासिक बदल आहे जो समाजमनानं मनापासून स्वीकारला आहे.

बहुसांस्कृततेचं, बहुधर्माचं मूल्यभान मनामनांत, सणावारात आज अभिव्यक्त  होताना दिसते आहे.ही काळाची गरज आमच्या करमाळकरांनी स्विकारली.ही गोष्ट लाखमोलाची वाटते.

अंजली राठोड श्रीवास्तव.करमाळा.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *