
प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय, करमाळा येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
करमाळा येथील प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयामध्ये ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व महिला सबलीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी करमाळा शहरातील व पंचक्रोशीतील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत महिलांना प्रमुख वक्त्या म्हणून महाविद्यालयामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये प्रमख अतिथी म्हणून डॉ. कविता कांबळे, डॉ. सुनिता दोशी, सुनिता देवी, अंजली श्रीवास्तव, सोनाली नलवडे, शहानुर सय्यद आणि जयश्री वीर या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, प्रतापसिंह मोहिते पाटील, राजमाता रत्नप्रभादेवी (अक्कासाहेब) मोहिते पाटील व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. यानंतर सर्व प्रमुख अतिथीनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुरुवातीला डॉ. कविता कांबळे यांनी महिलांचे आरोग्य व स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर सौ. सोनाली नलवडे घरगुती साफसफाईसाठी वापरले जाणारी उत्पादने कशी तयार केली जात्तात, त्यासाठी होणारा खर्च, त्यातून मिळणारा नफा व तोटा, ई. बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पुढे बोलताना सुनीताताई देवी यांनी शिक्षण क्षेत्रामधील त्यांनी केलेल्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले. त्यामध्ये त्यांनी नवभारत इंग्लिश स्कूल विषयी माहिती दिली. यानंतर अंजली श्रीवास्तव यांनी साहित्य क्षेत्रामधील त्यांचे योगदान व त्यांनी केलेल्या कवितांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. सुनिता दोशी यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवातून स्त्री-पुरुष समानता या विषयावर माहिती दिली. यानंतर जयश्री वीर यांनी रेशीम उद्योगाविषयी व शहानुर सय्यद यांनी महिलांचे संरक्षण कायदे यावर आपले मत व्यक्त केले.

तसेच यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी. व्हि. देशमुख यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी आदरणीय पद्मजादेवी (आईसाहेब) मोहिते पाटील, सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या मार्गदर्शनातून महाविद्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एम. जाधव यांनी केले आणि प्रास्ताविक डॉ. एस. डी. पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रा. ए. एस. चोपडे यांनी केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
