करमाळा प्रतिनिधी

आज केम येथे कुंकू कारखान्याच्या पाहणीसाठी हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार तथा विद्यमान विधान परिषद सदस्य हेमंत पाटील, परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल पाटील, तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, गटविकास अधिकारी अमित कदम, ग्रामसेवक वैभव तळेकर, कुंकू कारखानदार व केम ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी करमाळा तालुक्यातील केम, जातेगाव, कासार मळा, केम-सालसे व पोथरे येथील जलसंधारण विभागाच्या कामांबाबतच्या समस्या आणि निकृष्ट कामांच्या तक्रारी संबंधित अंदाज समितीसमोर मांडून आवश्यक पुरावे सादर करण्यात आले. या प्रकरणात आता प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे.

जलसंधारण विभागाच्या कामांतील अनियमितता व निकृष्ट कामांविरोधात प्रहार संघटनेच्या माध्यमातून येरवडा, पुणे तसेच मुंबईतील आझाद मैदान येथे अनेक वेळा आंदोलन करण्यात आले आहे. संबंधित कंपनीवर कारवाई करून ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली आहे.

हिवाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवनेरी कन्स्ट्रक्शनबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित करून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.

मात्र, मुख्य अभियंता नितीन दुसाने, अधीक्षक अभियंता चेतन कलशेट्टी, दक्षता व गुणनियंत्रण पथकाचे सुहास गायकवाड आणि कार्यकारी अभियंता राहुल क्षीरसागर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे.

शिवनेरी कन्स्ट्रक्शनला नेमके कोण पाठीशी घालत आहे? चौकशी करून दोषींवर कारवाई कधी होणार? असा सवाल उपस्थित करत, या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करावे आणि दोषी अधिकाऱ्यांवरही नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *