
‘आपलं घर कोणी भंगारात विकता?’
मकाई कारखान्याबाबत अप्पासाहेब झांजुर्णे यांचा सत्ताधाऱ्यांना संतप्त सवाल; १४० कोटींच्या निधीचा हिशेब मागितला
करमाळा : “एनसीडीसीकडून तब्बल १४० कोटी रुपये मिळाले, तरीही कारखाना चालवता आला नाही. आता एनसीडीसी कारखाना पुन्हा ताब्यात घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत कारखान्यातील मशिनरी भंगारात विकण्याची वेळ का आली? आपलं घर कोणी भंगारात विकता?” असा संतप्त सवाल श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब झांजुर्णे यांनी उपस्थित केला.
मकाई सहकारी साखर कारखान्याबाबत सध्या तालुक्यात विविध चर्चा सुरू आहेत. एका बाजूला कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची चर्चा असताना, दुसरीकडे कारखान्यातील मशिनरी १५ ते २० ट्रक भरून भंगारात विकण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप झांजुर्णे यांनी केला आहे. त्यामुळे कारखान्याच्या भवितव्याबरोबरच त्याच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
“आम्ही रक्ताचे पाणी करून, शेतकऱ्यांच्या विश्वासावर हा कारखाना उभा केला. हा कोणाच्या बापजाद्यांचा खासगी कारखाना नाही; हा सभासद शेतकऱ्यांचा सहकारी कारखाना आहे. त्यामुळे त्याची मशिनरी किंवा मालमत्ता मनमानी पद्धतीने भंगारात विकण्याचा अधिकार कोणाला दिला?” असा थेट सवाल झांजुर्णे यांनी केला.
एनसीडीसीकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यानंतरही कारखाना अपेक्षित पद्धतीने सुरू ठेवता आला नाही, अशी चर्चा सुरू आहे. त्यातच आता एनसीडीसी कारखाना पुन्हा ताब्यात घेणार असल्याची चर्चा होत आहे. जर कारखान्याची आर्थिक आणि प्रशासकीय परिस्थिती इतकी गंभीर झाली असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची? आणि कारखाना वाचविण्याऐवजी त्यातील मशिनरी भंगारात विकण्याचा निर्णय कोण घेत आहे? असा सवालही झांजुर्णे यांनी उपस्थित केला.
कारखाना चालविण्यात अपयश आले असेल, तर त्याची कारणे सभासद आणि शेतकऱ्यांसमोर मांडली पाहिजेत. कारखान्याला मिळालेल्या निधीचा विनियोग, कारखान्याची सध्याची आर्थिक स्थिती, मशिनरीची अवस्था आणि कारखान्याच्या मालमत्तेबाबत घेतले जाणारे निर्णय यांची पारदर्शक माहिती सभासदांसमोर ठेवणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली.
“कारखाना चालवता आला नाही म्हणून कारखान्याची मशिनरी भंगारात विकणे हा उपाय नाही. आधी कारखाना का बंद पडला, कोट्यवधींच्या निधीचे काय झाले आणि पुढे कारखाना कसा उभा करणार, याचा हिशेब द्या. कारखाना हा शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला आहे; तो भंगारात काढण्याचा अधिकार कोणालाही नाही,” असा घणाघात झांजुर्णे यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणाची संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी, कारखान्यातील मशिनरी व इतर मालमत्तेची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा आणि कोणत्याही प्रकारे मालमत्ता विक्री किंवा विल्हेवाट लावली जात असल्यास त्याची कायदेशीरता तपासावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मकाई कारखाना वाचणार की भंगारात जाणार? हा प्रश्न आता करमाळा तालुक्यातील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि सहकार क्षेत्रासमोर उभा राहिला असून, प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.