
शेतकऱ्यांकडील वीजबिल वसुली ताबडतोब थांबवून,वीजबिल माफिचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घ्यावा : नितीनभाऊ झिंजाडे
करमाळा :- शेतकऱ्यांकडील वीजबिल वसुली ताबडतोब थांबवून,वीजबिल माफिचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घ्यावा अशी अग्रही मागणी शेतकरी लोकसंघर्ष समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीनभाऊ झिंजाडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे केली आहे.उपमुख्यमंत्र्यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने राज्यातील

शेतकऱ्यांकडील वीजबिल वसुलीसाठी धडक वीजबीलवसुली मोहीम सुरु केली आहे.आधीच तोट्यात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वीजबिल भरणे परवडत नाही.वाढता मजुरी खर्च,शेतीला लागणारी खते,औषधे,कीटकनाशके,औजारे,उपकरणे,विद्युत मोटरी दुरुस्ती आदींच्या किमती बेसुमार वाढलेल्या आहेत.त्यामुळे शेती हा आतबाट्याचा धंदा झाला आहे.तूरळक शेतकरी वगळता 99% शेतकऱ्यांना शेती धंदा परवडतच नाही.या सर्व शेतकऱ्यांना शेतीसोबत इतर जोडधंदा केल्याशिवाय पोट भरन शक्य होत नाही. अशा परिस्थितीत शेतीपंपाचे वीजबिल भरणे शक्यच नाही.तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांना 24 तासाच्या बिलापोटी 66% वीजबिल अनुदान वीज वितरण कंपनीस देत असते व

वीज वितरण कंपनीही 24तास विज न देता फक्त 8-10 तासच वीज देते त्यामुळे शेतकरी वितरण कंपनीस काहीही देने लागत नाही. यातही शेतकऱ्यांना मिळणारी वीज कधीही पूर्ण दाबाने नसते,अवेळी रात्री बेरात्री असते.जंगली श्वापदापासून जीव वाचवत, जीवाची पर्वा न करता शेतकरी शेती करत असतो.
या अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांकडील शेतीपंपाचे वीजबिल वसुली ताबडतोब थांबवावी व वीजबिल माफिचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणेत यावा असं म्हंटल आहे.
