
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जिओ मोबाईल नेटवर्कची सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. वीज गेल्यानंतर काही भागात मोबाईल इंटरनेटचा वेग अत्यंत कमी होतो, तर अनेक वेळा कॉल करण्यासही अडचणी निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वीजपुरवठा बंद असताना मोबाईल नेटवर्कवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने ऑनलाइन व्यवहार, UPI पेमेंट, शासकीय ऑनलाइन सेवा, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन काम तसेच व्यावसायिकांचे दैनंदिन कामकाज प्रभावित होत नाही. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल संपर्क तुटणे ही गंभीर बाब असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
जिओच्या अधिकृत माहितीनुसार नेटवर्कची गुणवत्ता सिग्नलची ताकद, नेटवर्कवरील वापरकर्त्यांची संख्या, भौगोलिक परिस्थिती आणि इतर तांत्रिक कारणांमुळे बदलू शकते. तसेच कंपनीच्या तांत्रिक माहितीनुसार नेटवर्क साइटवरील वीजपुरवठा व उपकरणांची उपलब्धता ही सेवा सुरळीत राहण्यासाठी महत्त्वाची असते.
करमाळा शहरात वीज गेल्यानंतर जिओ नेटवर्क सेवा सुरळीत राहण्यासाठी संबंधित कंपनीने आवश्यक बॅकअप व्यवस्था व तांत्रिक उपाययोजना कराव्यात, यावी अशी मागणी व्यापारी राधेश्याम देवी यांनी केली आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी जिओ कंपनीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यापारी वर्गा कडून व्यक्त केली जात आहे.