करमाळा प्रतिनिधी

प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय, करमाळा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या विविध विद्यार्थी क्लबचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे डॉ. गणेश करे-पाटील व करमाळा येथील प्रसिद्ध डॉ. प्रचिती पुंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व लोकनेते प्रतापसिंह मोहिते यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व विविध विद्यार्थी क्लबचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला, नेतृत्व गुणांना आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीला चालना मिळणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

प्रमुख अतिथी डॉ. गणेश करे-पाटील यांनी विद्यार्थ्यांना नोकरी आणि करिअर यांतील मूलभूत फरक समजावून सांगितला. विविध उदाहरणे, प्रेरणादायी प्रसंग आणि कवितांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रेरित केले. यशस्वी करिअरसाठी ध्येय निश्चिती, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

डॉ. प्रचिती पुंडे यांनी विद्यार्थ्यांना ‘सबकॉन्शस माईंड’चा प्रभावी वापर करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. मानसिक एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी दोन्ही मान्यवरांनी आपले स्वानुभव कथन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

याच प्रसंगी डॉ. गणेश करे-पाटील यांनी महाविद्यालयास प्रदान केलेल्या वॉटर प्युरिफायरचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या या योगदानाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पटवून देत या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच महाविद्यालयात सुरू करण्यात आलेले विविध विद्यार्थी क्लब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रविण देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या समन्वयक डॉ. मंजुश्री झगरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. नितीन पवार यांनी मानले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *