

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या सहकार चळवळीचा कणा मानले जाणारे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना आणि श्री मकाई सहकारी साखर कारखाना आज सहकाराच्या मूळ तत्त्वांपासून दूर गेले असून, ही संपूर्ण करमाळा तालुक्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि चिंताजनक बाब असल्याची खंत श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब झांजुर्णे यांनी व्यक्त केली आहे.

पत्रकारांशी बोलताना आप्पासाहेब झांजुर्णे म्हणाले की, “श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना स्थापनेपासून केवळ माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या कार्यकाळाचा अपवाद वगळता इतर कोणालाही हा कारखाना पारदर्शक, सक्षम आणि शेतकरीहिताच्या दृष्टीने प्रभावीपणे चालविता आला नाही.”

मकाई कारखान्याच्या आपल्या कार्यकाळाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “मी चेअरमन असताना श्री मकाई सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील तीन पुरस्कार मिळाले. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत होते, व्यापाऱ्यांची देणी नियमित दिली जात होती आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य व चांगला दर मिळत होता. कारखान्याची आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हता राज्यासाठी आदर्श ठरली होती.”
मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या विविध संचालक मंडळांनी सहकारापेक्षा राजकारण आणि वैयक्तिक स्वार्थाला प्राधान्य दिल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, त्याचाच परिणाम म्हणून आज दोन्ही कारखाने प्रचंड कर्जबाजारी झाले असून, त्यांना भाडेतत्त्वावर अथवा खाजगी व्यवस्थापनाकडे चालविण्यास देण्याची वेळ आली आहे.
“करमाळ्यात सक्षम नेतृत्व उरले नाही का ?”
या पार्श्वभूमीवर त्यांनी संतप्त शब्दांत सवाल केला, “करमाळा तालुक्यात एकही सक्षम नेतृत्व उरले नाही का ?” एकेकाळी तालुक्याच्या अर्थकारणाला गती देणारे आणि हजारो शेतकरी, कामगार व व्यापाऱ्यांचे जीवनमान उंचावणारे हे दोन्ही सहकारी कारखाने आज स्वतःची प्रतिष्ठा गमावून बसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
१४० कोटींच्या सहाय्यानंतरही कारखाना सक्षम झाला नाही
आप्पासाहेब झांजुर्णे यांनी सांगितले की, श्री मकाई सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडून सुमारे १४० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळाले होते. मात्र एवढा निधी उपलब्ध होऊनही कारखाना सक्षमपणे उभा राहू शकला नाही. सध्या तो युगेंद्र पवार यांच्याकडे भाडेतत्त्वावर चालविण्यास दिल्याची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना देखील आमदार नारायण पाटील यांच्या कार्यकाळात एका खाजगी संस्थेकडे चालविण्यास देण्यात आल्याचा उल्लेख करत, ही सहकार चळवळीच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी म्हटले.
राजकीय परिणाम अटळ
या सर्व घडामोडींचे करमाळा तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होतील, असा विश्वास व्यक्त करत आप्पासाहेब झांजुर्णे म्हणाले, “सहकाराच्या नावावर झालेल्या या अधोगतीला जनता योग्य वेळी उत्तर देईल. येत्या काळात करमाळा तालुक्याच्या राजकारणात मोठे आणि आमूलाग्र बदल घडतील, अशी मला अपेक्षा आहे.”