
करमाळा प्रतिनिधी
दिनांक २५ जून २०२६ रोजी लोकनेते प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय, करमाळा यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत करमाळा येथील श्री जगदंबा कमलाभवानी मूकबधिर निवासी विद्यालय, देवीचा माळ तसेच एकलव्य निवासी आश्रम शाळा, करमाळा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

सदर उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

याप्रसंगी महाविद्यालयात लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर यांनी आपल्या मनोगतात लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
हा उपक्रम सामाजिक जाणीव व सेवाभाव जोपासणारा ठरला असून उपस्थितांनी त्याचे स्वागत केले.