
करमाळा प्रतिनिधी
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २३ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ म्हणजेच ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून करमाळा नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शना नुसार श्री. ज्ञानेश्वर वाचन मंदिर येथे एकल महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांना विविध शासकीय कल्याणकारी योजनांची सखोल माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महामानव महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना आम्रपाली कांबळे यांनी, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन समाजात विधवा महिलांची दुरावस्था सुधारण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी केलेल्या ऐतिहासिक संघर्षाची व प्रयत्नांची माहिती दिली.

एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, कायदेशीर आणि मानवी हक्कांबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील लोकप्रतिनीधिंनी त्यांच्या वार्ड मधिल एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तसेच विविध अडचणी सोडवण्यासाठी कार्यक्रमाचा लाभ घेण्यास सुचविले.

शासकीय योजनांचे सखोल मार्गदर्शन
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या उपजीविकेच्या संधी वाढवण्यासाठी नगर परिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण शासकीय योजनांची माहिती दिली.
सामाजिक सुरक्षा व पेन्शन योजना : सारिका रंदवे यांनी ‘संजय गांधी निराधार योजना’, ‘श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना’ आणि ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना’ यांविषयी सविस्तर माहिती देऊन पात्रतेचे निकष समजावून सांगितले.
गृहनिर्माण योजना : एकल महिलांना हक्काचे घर मिळावे यासाठी संकल्प शहाणे यांनी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ तर अश्विनी जाधव यांनी ‘रमाई आवास योजना’ या अंतर्गत मिळणाऱ्या लाभांची माहिती दिली.
आर्थिक व विमा संरक्षण : तुषार टांकसाळे यांनी ‘प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi)’ योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज, ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’, ‘प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना’ तसेच ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ आणि ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना’ यांविषयी सखोल मार्गदर्शन केले.
दिव्यांग कल्याण : सुप्रिया पालखे यांनी ‘दिव्यांग कल्याण निधी’ व त्याअंतर्गत मिळणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली.
महिलांच्या अडचणींवर जागेवरच तोडगा
कार्यक्रमादरम्यान उपस्थित एकल महिलांना शासकीय कागदपत्रे गोळा करताना किंवा फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. उपस्थित अधिकाऱ्यांनी या अडचणींवर योग्य ते कायदेशीर व प्रशासकीय मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच छताखाली मिळाल्याबद्दल उपस्थित महिलांनी प्रशासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी शीतल बहाड, सर्व विभाग प्रमुख, प्रदीप चौकटे, बद्रीनाथ गायकवाड यांच्यासह शहरातील एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.