
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार व तातडीची हृदयरोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये “कै. डॉ. प्रदीप कुमार (आबा) जाधव पाटील कार्डियाक केअर युनिट अँड कॅथलॅब” ही अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यात आली आहे.


ग्रामीण भागातील रुग्णांना हृदयविकाराच्या तपासण्या व उपचारांसाठी पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, बार्शी, अकलूज, बारामती किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. मात्र, आता अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसह विविध हृदयरोग निदान व उपचार सुविधा करमाळ्यातच उपलब्ध होणार असल्याने रुग्णांचा वेळ, खर्च आणि धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेल्या या कार्डियाक केअर युनिटमुळे हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार देणे शक्य होणार आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्वर्गीय डॉ. प्रदीप कुमार (आबा) जाधव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेली ही सुविधा ग्रामीण आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलच्या आरोग्यसेवेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या सुविधेमुळे करमाळा तालुक्यात आधुनिक आरोग्यसेवेची नवी ओळख निर्माण होणार असून, हृदयरोग उपचार क्षेत्रात करमाळा आता अधिक सक्षम बनणार आहे असे डॉ. रोहन पाटील यांनी सांगितले.