
सोलापूर, दि. 14 (जिमाका) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने सोलापूर जिल्ह्यात अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्यावर धडक कारवाई करत एकूण 11 लाख 55 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली आहे.

डॉ. राजेश देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, प्रसाद सुर्वे, सह आयुक्त (अं.व.द.), राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच सागर धोमकर, विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांनी ही कारवाई केली.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात खामगाव-पिंपळगाव रस्त्यालगत पवार फार्महाऊस शेजारी झाडाझुडपामध्ये लपवून ठेवलेला मद्यसाठा महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये जप्त करण्यात आला. या कारवाईत गोवा बनावटीच्या “अॅडोरियल व्हिस्की”च्या 750 मिली क्षमतेच्या 1284 सिलबंद बाटल्या (107 बॉक्स) असा एकूण 11,55,600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

दि. 22 एप्रिल 2026 रोजी माढा तालुक्यातील उपळाई गाव परिसरात अवैध मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यावर कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर काही ढाबेमालकांकडून हल्ला करण्यात आला होता. या घटनेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण होऊन ते जखमी झाले होते. त्यानंतर विभागीय उप आयुक्त, पुणे विभाग यांच्या आदेशानुसार सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध मद्यसाठा व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने सदरची कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान घटनास्थळी आढळून आलेल्या इसमास अटक करण्यात आली असून जप्त मद्यसाठ्याबाबत त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सदरची कारवाई निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विराज माने, धीरज सस्ते, निनाद निकम, सहायक दुय्यम निरीक्षक अलिम शेख, जवान शशिकांत भट, राहुल तारळकर, प्रविण पुसावळे, हृतिक कोळपे तसेच वाहन चालक झिंगळे यांनी पार पाडली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक निनाद निकम करीत आहेत.
विभागीय भरारी पथक, पुणे विभाग यांनी अवैध मद्यविक्री करणारे ढाबे, गोडाऊन व संबंधित इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 93 अन्वये कठोर कारवाई व तडीपार मोहिम हाती घेतली आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या गोवा राज्यातील अथवा बनावट मद्यविक्रीची माहिती विभागास दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. अधिक माहितीसाठी व तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 18008333333 वर संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे विभाग, पुणे नरेंद्र थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000