करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यात सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि संस्कार जपणारा श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा यंदा चौथ्या वर्षी अत्यंत भव्य स्वरूपात पार पडणार असून, रविवार दिनांक १० मे २०२६ रोजी चांदगुडे प्लॉटिंग, बायपास रोड, करमाळा येथे तब्बल २५ जोडपी विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे प्रमुख तथा भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “या विवाह सोहळ्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने सर्व व्यवस्था पूर्णपणे मोफत करण्यात आली असून, वधू-वरांचे पोशाख, मनी मंगळसूत्र, संसारोपयोगी साहित्य, भोजन व्यवस्था, मंडप, सजावट तसेच धार्मिक विधींसाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पारंपरिक आणि धार्मिक वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न होणार असून हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत.

विवाहस्थळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय मदत केंद्र तसेच वाहनतळाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच २० ते २५ हजार वऱ्हाडी मंडळींसाठी भोजनाची भव्य व्यवस्था करण्यात आली असल्याचेही चिवटे यांनी सांगितले. यावेळी प्रत्येक नवरदेवाची कुटुंबाप्रमाणे हौस पूर्ण करण्यात येणार असून, घोड्यावरून ढोल-ताशांच्या गजरात बॅन्जो सह स्वतंत्र भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण करमाळा तालुक्यात या सोहळ्याबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भव्य विवाह सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह भाजपचे जिल्ह्यातील आमदार, जिल्हा पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभाशीर्वाद देणार आहेत.

विशेष म्हणजे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १० मे रोजी दुपारी २ वाजता करमाळा येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तहसील कार्यालय येथे उपस्थित राहणार असून, जवळपास दोन तास नागरिकांच्या समस्या निवारणासाठी वेळ देणार आहेत.

त्यानंतर ते विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेस भाजप तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अफसर तात्या जाधव, रामभाऊ ढाणे, काकासाहेब सरडे, जगदीश अग्रवाल, नितीन झिंजाडे, ज्येष्ठ नेते संजय अण्णा घोरपडे, ॲड. भगवानगिरी गोसावी, बाळासाहेब गोरे गुरुजी, दादा देवकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीराम प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून, सामुदायिक विवाह हा त्यातील एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम ठरत असल्याचे गणेश चिवटे यांनी सांगितले. विवाहातील अनावश्यक खर्च टाळून समाजहिताचे कार्य करण्याची प्रेरणा या उपक्रमातून मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *