करमाळा प्रतिनिधी

आज जेऊर परिसरात दुपारी सुमारे 1.38 वाजता तब्बल 41 अंश सेल्सिअस तापमानात एक दुर्मीळ ‘जपानी कॉर्मोरंट’ पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला. संबंधित पक्षी पंख पसरवत उडण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याला उडता येत नसल्याचे दिसून आले. जवळून पाहणी केली असता त्याचा डावा पाय गंभीररित्या मोडलेला असल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव वाघमारे, तसेच सचिन कांबळे व महेश चांदणे यांनी तात्काळ मदतकार्य हाती घेतले. त्यांनी जखमी पक्षाला पाणी पाजून प्राथमिक मदत केली आणि तातडीने जेऊर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एन. होळकर यांनी पक्षाची तपासणी केली असता त्याचा एक पाय सुमारे 90 टक्के मोडलेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी तत्परतेने उपचार करत जखमी पायाला प्लास्टर केले व आवश्यक वैद्यकीय उपचार दिले.

यानंतर संबंधित पक्षाला पुढील देखभाल व पुनर्वसनासाठी मोहोळ येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष साहेबराव वाघमारे, रिक्षा चालक सचिन कांबळे, गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत साळवे, शिवाजी आबा आवटे उपस्थित होते. वनविभागाच्या आयेशा शेख व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे पक्षी सुरक्षितपणे देण्यात आला.

जखमी ‘जपानी कॉर्मोरंट’ पक्षाची योग्य काळजी घेऊन त्याला पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करण्यात यावे, अशी मागणी उपस्थितांनी केली आहे.

या घटनेत स्थानिकांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता निसर्ग व वन्यजीव संरक्षणासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *