करमाळा प्रतिनिधी

“नवीन कल्पना व संशोधनातूनच राष्ट्राचा विकास शक्य”- डॉ . दुर्गसिंह चव्हाण (प्र-कुलगुरू,  जीएलए विद्यापीठ, मथुरा प्र-कुलगुरू)

दत्तकला शिक्षण संस्था संचलित दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स स्वामी-चिंचोली येथे “ट्रेंड्स इन मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग स्ट्रीम्स (TIMES-2026)” या विषयावर आयोजित पहिली आंतरराष्ट्रीय परिषद दि. १३ व १४ मार्च २०२६ रोजी उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

ही परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच फिलिपाईन्समधील युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेकनॉलॉजि यांच्या सहकार्याने हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. परिषदेस भारतासह फिलिपाईन्स, इंडोनेशिया व तैवान येथील संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ, संशोधन विद्वान तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

उद्घाटन समारंभासाठी डॉ. दुर्गसिंह एस .चव्हाण (प्र-कुलगुरू, जीएलए विद्यापीठ, मथुरा प्र-कुलगुरू) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच राजेंद्र व्ही. गंगार्डे (संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, विश्वगुरू इन्फोटेक प्रा. लि.) व डॉ. आर. अश्वनी (सीईओ, वॅनिक्स टेक्नॉलॉजीज प्रा. लि.) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी परदेशातून डॉ. कॅथलीन एबोरा पॅड्रिगालन (इलेक्ट्रोमेकॅनिकल तंत्रज्ञान विभाग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेकनॉलॉजि, फिलीपिन्स), डॉ. द्वी सुदार्नो पुत्रा (ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी विभाग, फॅकलटी ऑफ इंजिनीरिंग, युनिव्हर्सिटस नेगेरी पदांग, इंडोनेशिया), डॉ. मायसेल ए. कॅपिलायन (इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभाग, युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेकनॉलॉजि, फिलीपिन्स) तसेच डॉ. फिरोज इस्माईल मुलाणी (रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनीअर, लॅब्रॅय ओप्तोइलेकट्रोनिक टेकनॉलॉजि कंपनी, तैवान) हे मुख्य व्याख्याते म्हणून उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. परिषद संयोजक डॉ. एस. एस. बेरे यांनी स्वागतपर भाषणात परिषदेची उद्दिष्टे स्पष्ट करताना संशोधन, नावीन्य आणि व्यवस्थापन व अभियांत्रिकी क्षेत्रातील समन्वय यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच संचालक प्रा. श्रीकांत साळुंके यांनी आंतरराष्ट्रीय परिषदांचे महत्त्व सांगत संशोधन व शैक्षणिक सहकार्य वाढीसाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिवा माया झोळ तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर उपस्थित होते. यावेळी संचालक प्रा. श्रीकांत साळुंके, डॉ. शरद कर्णे, प्राचार्य डॉ. संभाजी पाटील, प्रा. राजेंद्र वाबळे तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे राजेंद्र गंगार्डे यांनी आपल्या भाषणात संशोधन, नवोपक्रम आणि तांत्रिक प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागातून प्रगती करत जागतिक स्तरावर यश मिळवण्याचा त्यांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यांनी अभियंते समाजातील समस्या सोडवणारे घटक असल्याचे सांगत “जिथे समस्या, तिथे अभियंता” हा संदेश दिला.

डॉ. दुर्गसिंह एस .चव्हाण यांनी आपल्या मनोगतात जागतिक स्तरावरील बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर संशोधन व नवोपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रायोगिक ज्ञानावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रा. रामदास झोळ यांनी शिक्षण, संशोधन व नावीन्य यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या संस्थेच्या ध्येयावर प्रकाश टाकला.

या परिषदेत आंतरराष्ट्रीय की-नोट वक्त्यांनी विविध अत्याधुनिक विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. कॅथलीन एबोरा पॅड्रिगालन यांनी पवनचक्की देखभालीसाठी उभ्या पृष्ठभागावर चढणाऱ्या रोबोटच्या प्रोटोटाइपवर सादरीकरण केले. डॉ. द्वी सुदार्नो पुत्रा यांनी आधुनिक मोटर प्रणाली व स्मार्ट तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी डॉ. मायसेल ए. कॅपिलायन यांनी जैवसंकेत विश्लेषण व मानवी आरोग्य या विषयावर सखोल माहिती दिली, तर डॉ. फिरोज इस्माईल मुलाणी यांनी “नेट झिरो एनर्जी बिल्डिंग” संकल्पनेवर मार्गदर्शन केले.

दोन दिवसीय परिषदेत संशोधन निबंध सादरीकरण, तांत्रिक सत्रे, प्रश्नोत्तर सत्रे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. देश-विदेशातील संशोधक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

संशोधन निबंधांचे मूल्यांकन विविध संस्थांतील तज्ज्ञ परीक्षकांमार्फत पारदर्शक पद्धतीने करण्यात आले. उत्कृष्ट सादरकर्त्यांना आकर्षक पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. एस. एस. काठाळे, डॉ. एस. एस. बेरे व डॉ. एन. पी. देशमुख यांनी संयोजक म्हणून कार्य केले. तसेच सर्व विभागप्रमुख, अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक योगदान देऊन परिषद यशस्वी केली.

समारोप प्रसंगी आभार प्रदर्शन करून परिषद यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवर, वक्ते, परीक्षक, संशोधक व सहभागी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *