करमाळा प्रतिनिधी

सध्या काही ठिकाणी समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा आणि लोकांना भडकवण्याचा प्रयत्न काही व्यक्तींमार्फत केला जात असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी आपण सर्वांनी शांतता, संयम आणि सामाजिक सद्भावना जपणे अत्यंत गरजेचे आहे.

रमजान ईद अगदी जवळ आली असून संपूर्ण भारतात तसेच जगभरात ईदच्या खरेदी-विक्रीला मोठी लगबग सुरू आहे. मात्र या काळात सोशल मीडियावर काही अफवा किंवा दिशाभूल करणारे संदेशही पसरवले जात आहेत. त्यामुळे समाजात गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी जागरूक राहणे आवश्यक आहे.

सकल मुस्लीम समाज करमाळा व भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा यांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधव आणि भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की, ईदची खरेदी करताना दुकानदाराची जात किंवा धर्म पाहू नका. तुम्हाला जर एखाद्या दुकानात योग्य किंमतीत आणि चांगल्या दर्जाचा माल मिळत असेल तर तो दुकानदार हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख किंवा इतर कोणत्याही समाजाचा असो निःसंकोचपणे त्या दुकानातून खरेदी करा.

करमाळा व सोलापूर आणि महाराष्ट्रातील अनेक शहर परिसरात मोठी कपड्यांची होलसेल मार्केट आहे. तसेच शहरातील अनेक भागांमध्ये विविध समाजातील व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. या सर्व व्यापाऱ्यांमध्ये हिंदू, (सिंधी, गुजराती, मारवाडी, जैन) मुस्लिम, ख्रिश्चन, शीख व बुध्द तसेच इतर समाजातील लोक प्रामाणिकपणे व्यापार करत आहेत.

त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या अफवा किंवा भडकावू संदेशांवर विश्वास ठेवू नका. “फक्त अमुक समाजाच्या दुकानातूनच खरेदी करा” किंवा “अमुक ठिकाणाहून खरेदी करू नका” अशा प्रकारच्या संदेशांकडे दुर्लक्ष करा.

आपण ग्राहक म्हणून फक्त एवढेच पहा की आपल्याला योग्य किंमतीत, चांगल्या गुणवत्तेचा आणि समाधानकारक माल मिळत आहे का. जर माल योग्य दरात आणि चांगल्या गुणवत्तेत मिळत असेल तर कोणत्याही दुकानातून निःसंकोचपणे खरेदी करा.

ईद हा आनंद, बंधुता आणि एकतेचा सण आहे. त्यामुळे खरेदी करताना जात-धर्म न पाहता सद्भावना, विश्वास आणि सामाजिक ऐक्य जपणे हीच खरी ईदची भावना आहे.

चला, या पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने आपण सर्वांनी मिळून करमाळा शहरात शांतता, बंधुता आणि सामाजिक ऐक्य अधिक मजबूत करूया.

यावेळी समीर शेख,  जमीर सय्यद,  मुस्तकीम पठाण, सुरज शेख, रमजान बेग,  जहांगीर बेग,  इकबाल शेख, इम्तियाज पठाण, आझाद शेख, फिरोज बेग, कलंदर शेख, जावेद सय्यद, शाहीद बेग, अलिम पठाण, अरबाज बेग, कलीम शेख, दिशान कबीर, खलील कुरेशी, सुपरान शेख, शाहरुख शेख, गुलाम सय्यद, कय्युम मदारी, अक्रम मदारी, दाऊद मदारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *