करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील घरतवाडी (घरतवाडी परिसरासह) येथे गेल्या अनेक वर्षांपासून विविध विकासकामे प्रलंबित असून, मुख्यत्वे गावाला जोडणारे अंतर्गत व मुख्य रस्ते अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात चिखल, तर उन्हाळ्यात धूळ यामुळे विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या भागाकडे प्रशासन तसेच राजकीय लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार निवेदने देऊनही तसेच तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्र येत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत गावातील प्रलंबित विकासकामे पूर्ण केली जात नाहीत, तोपर्यंत मतदान न करण्याचा निर्णय ग्रामसभेत एकमुखी घेण्यात आला आहे. याबाबतचा ठराव अधिकृतरीत्या पारित करण्यात आला असून, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग अवलंबण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, केवळ निवडणुकीच्या वेळीच आश्वासने दिली जातात, मात्र निवडणूक संपल्यानंतर गावाच्या समस्यांकडे कोणीही फिरकून पाहत नाही. रस्त्यांबरोबरच पाणीपुरवठा, वीज सुविधा व इतर मूलभूत सुविधांबाबतही अडचणी कायम आहेत. त्यामुळे यावेळी केवळ आश्वासनांवर विश्वास न ठेवता ठोस कृती होईपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती देताना मा. सदस्य ग्रामपंचायत कुंभारगाव अनिकेत गायकवाड यांनी सांगितले की, “आमच्या घरतवाडी परिसरात अनेक वर्षांपासून रस्ते अपूर्ण आहेत. पावसाळ्यात गावाकडे येणे-जाणे कठीण होते. अनेक वेळा प्रशासनाला निवेदन दिले, लोकप्रतिनिधींना भेटलो, पण कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी एकमताने निर्णय घेतला आहे की, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मतदान करणार नाही.”

या घटनेमुळे तालुक्यात तसेच जिल्ह्यात चर्चेला उधाण आले असून, प्रशासन या निर्णयावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांच्या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *