
करमाळा प्रतिनिधी
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या श्रमसंस्कार शिबिराचे देवळाली येथे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.
याप्रसंगी बोलताना विलासराव घुमरे सर म्हणाले की, श्रमसंस्कार शिबिरातून अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी घडलेले आहेत. या शिबिरामधून विद्यार्थ्यांमध्ये श्रम, संस्कार, शिस्त आणि समाजामध्ये वावरण्याचा अनुभव मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या शिबिराच्या माध्यमातून होतो म्हणून शिबिरामध्ये सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या शिबिर कालावधीमध्ये गावाचा कायापालट करावा आणि आपल्या शक्तीचा सदुपयोग करून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करावा असे प्रतिपादन केले.

यावेळी बोलताना विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर म्हणाले की, वरिष्ठ महाविद्यालयाचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर श्रमसंस्कार शिबिरातून घेणे गरजेचे आहे. कारण या शिबिरातून ग्रामीण भागातल्या विविध समस्या विद्यार्थ्यांना कळू शकतात आणि त्यामुळे त्यांना त्या समस्यांची जाणीव निर्माण होते. म्हणून हे शिबिर यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवकांनी स्वतःला वाहून घेतले पाहिजे.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य अभिमन्यू माने यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपातून विद्यार्थी दशेपासून ते प्राचार्या पर्यंत मी एन.एस.एस.च्या माध्यमातून कसा घडलो हा अनुभव सांगितला. या कार्यक्रमासाठी देवळाली या गावचे पत्रकार प्रफुल्ल दामोदरे यांनी आपल्या मनोगततून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व राष्ट्रीय योजना यांच्याविषयी गौरवोद्गार काढून त्यांना आलेले अनुभव सर्व स्वयंसेवकांना सांगितले व मी घडण्यामागे राष्ट्रीय सेवा योजनेचा कसा सहभाग आहे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

यावेळी उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, देवळाली गावचे तलाठी अमोल यादव, ग्रामसेवक दत्तात्रय निकम, मुख्याध्यापक भैरू गभाले, माजी सरपंच आशिष गायकवाड, विद्यमान सरपंच पोपट बोराडे, कनिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. लक्ष्मण राख, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
23 जानेवारी ते 29 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या शिबिरामध्ये विविध विषयांवर व्याख्याने असणारा असून, या शिबिरामध्ये स्वच्छता अभियान, स्वच्छ गाव सुंदर गाव, वृक्षारोपण, पर्यावरण जागृती, व्यसनमुक्ती, जनजागृती, आरोग्य तपासणी पशु लसीकरण,पशुसंवर्धन मार्गदर्शन व सांडपाणी व्यवस्थापन मार्गदर्शन यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. सुधीर मुळीक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कृष्णा कांबळे व सूत्रसंचालन डॉ.विजया गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.