
करमाळा प्रतिनिधी
शिक्षण चळवळीतील शिलेदारांचा गौरव : कुंभारगावचे मुख्याध्यापक नानासाहेब आढाव पाटील यांना “आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार” प्रदान
करमाळा
सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्या., बाळे (सोलापूर) यांच्या वतीने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील शिलेदारांचा भव्य सन्मान सोहळा रविवारी दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सिहगड कॉलेज, कोर्टी–पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यात कुंभारगाव येथील शरदचंद्र पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा श्रीराम शिक्षण मंडळाचे सचिव नानासाहेब आढाव पाटील यांना त्यांच्या दीर्घकालीन व उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत “आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
हा सन्मान प्राप्त झाल्यामुळे कुंभारगाव परिसरासह संपूर्ण तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नानासाहेब आढाव पाटील यांनी आपल्या सेवाकाळात केवळ अभ्यासक्रमापुरते शिक्षण न देता विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक, सामाजिक व नैतिक विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार, मूल्याधारित शिक्षण यावर त्यांनी विशेष भर दिला.
क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शैक्षणिक सहली अशा विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण व स्पर्धात्मक क्षमता विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.
विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी डिजिटल शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती, प्रयोगशील शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, पालक–शिक्षक संवाद यावर सातत्याने भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाने शैक्षणिक निकालांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले असून अनेक विद्यार्थी विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहेत.
श्रीराम शिक्षण मंडळाचे सचिव म्हणूनही नानासाहेब आढाव पाटील यांनी संस्थेच्या विकासासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळेच्या भौतिक सुविधा सक्षम व्हाव्यात, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.
या सन्मान सोहळ्यास सदस्य दत्तात्रय अच्युतराव सावंत (सर) (पुणे विभाग शिक्षक मतदार संघ) हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधून निवड करण्यात आलेल्या आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक (महिला व पुरुष), आदर्श कला/क्रीडा/संगीत शिक्षक, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्वच्छ व सुंदर शाळा यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्रातील शिक्षक मतदार संघातील शिक्षक बांधव, सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूरचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक, सचिव व कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्यालयाचे शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय मान्यवरांकडून नानासाहेब आढाव पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
“आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार” हा नानासाहेब आढाव पाटील यांच्या प्रामाणिकपणा, निष्ठा, समर्पण आणि शिक्षण चळवळीतील योगदानाचा गौरव असून ते निश्चितच येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरणार आहेत.

