
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील केम पंचायत समिती गणातून माजी आमदार संजय मामा शिंदे गटातून संदीप तळेकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविल्याने राजकीय वातावरण तापले आहे. केम गावचे युवा नेते, चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले संदीप तळेकर हे संघर्ष, आंदोलन आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी ओळखले जाणारे नेतृत्व आहे.

प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, दिव्यांग बांधव, महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. केम गावातील तसेच संपूर्ण तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा, ऊस बिल, रेल्वे थांबा, दिव्यांगांचे हक्क, शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतकरी मालाला हमीभाव यांसाठी त्यांनी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलने केली. या आंदोलनांमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले असून शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष न्याय मिळाला आहे.

माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून केम ढवळस रस्ता रेल्वे भुयारी मार्ग मंजूर करून काम चालू केले. केम गावासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडून विविध कामाचा पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेण्यात आला.
तसेच रेशन कार्ड, घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यासह अनेक विधवा महिलांचे प्रश्न सोडवून त्यांनी प्रशासनाकडून मदत मिळवून दिली. केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणारे आणि आंदोलनात नेहमी आघाडीवर असणारे प्रशासनावर दबाव असणारे एकमेव नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
आजपर्यंत सत्तेबाहेर राहूनही जनतेसाठी लढणारे संदीप तळेकर आता पंचायत समितीच्या माध्यमातून थेट लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. संजयमामा शिंदे गटातून मिळणारा पाठिंबा आणि तळागाळातील जनतेशी असलेली घट्ट नाळ पाहता केम गणातील राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याची चर्चा आहे.
जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेले नेतृत्व आता निर्णयाच्या टेबलावर बसणार का, याकडे संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
………………………..
केम पंचायत समिती गणातून संदीप तळेकर निवडून आल्यास प्रतिक्रिया…
सर्वसामान्यांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार
करमाळा तालुक्यातील केम पंचायत समिती गणातून संदीप तळेकर यांची पंचायत समिती सदस्यपदी निवड झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. निवडून आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, करमाळा पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना या गणातील प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.
प्रतिक्रिया देताना संदीप तळेकर म्हणाले, “पंचायत समिती अंतर्गत मिळणाऱ्या योजना या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात गरजू लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. शेतकरी वर्ग, दिव्यांग बांधव, महिला, वंचित व दुर्बल घटक यांना योजनांचा थेट लाभ मिळावा, हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
ते पुढे म्हणाले की, गणातील प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थांशी समन्वय साधून योजनांची माहिती देण्यात येईल. अनेक वेळा माहितीअभावी गरजू लाभार्थी योजनांपासून वंचित राहतात. ही दरी भरून काढण्यासाठी गावागावात जनजागृती, मार्गदर्शन शिबिरे व पंचायत समितीमार्फत पाठपुरावा केला जाईल.
शेतकऱ्यांसाठी कृषी योजना, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांना प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत योजना पोहोचवणे हीच खरी लोकसेवा आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
संदीप तळेकर हे केम गणातील विकासकामांना चालना मिळेल, तसेच पंचायत समिती स्तरावर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.