
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात नवनियुक्त प्रभारी प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने तसेच कनिष्ठ विभागाचे प्रशासकीय अधिकारी संभाजीराव किर्दाक यांचा विद्या विकास मंडळाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी तसेच अध्यक्ष मिलिंद फंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना संस्थेचे सचिव विलासराव घुमरे म्हणाले की, डॉ. अभिमन्यू माने हे महाविद्यालयाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम व योग्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना मी त्यांच्या विद्यार्थीदशेपासून तसेच महाविद्यालयात सेवेत रुजू झाल्यापासून आजपर्यंतच्या सेवाकाळात जवळून पाहिले आहे. संस्थेबद्दल व महाविद्यालयाबद्दल असलेली त्यांची निष्ठा आणि आस्था मला नेहमीच जाणवली आहे. महाविद्यालयाची प्रगती आणि लौकिक वाढविण्यासाठी माझ्याकडून जे सहकार्य आवश्यक असेल, ते मी सातत्याने देत राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

संस्थेचे अध्यक्ष मिलिंद फंड आपल्या मनोगतात म्हणाले की, महाविद्यालयाचे प्रशासन, प्राचार्य व संस्था यांच्यात समन्वय साधण्याचे महत्त्वाचे कार्य करत असताना, आजपर्यंतच्या प्राचार्यांपैकी डॉ. माने हे सर्वाधिक समन्वयक व सोयीस्कर ठरतील, असा मला ठाम विश्वास आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याकडून काम करून घेण्याची त्यांची सकारात्मक वृत्ती निश्चितच प्रशंसनीय आहे.
याप्रसंगी नवनियुक्त प्रभारी प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने म्हणाले की, घुमरे सरांनी आणि संस्थेने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडेन. संस्थेने दाखवलेल्या विश्वासाशी कधीही तडजोड करणार नाही. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बिडवे सर, डॉ. गो. बनहट्टी सर तसेच डॉ. मीरा रामनवमीवाले मॅडम यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी पुढील वाटचाल करेन. विद्यार्थीदशेपासूनच घुमरे सर हे माझे मार्गदर्शक राहिले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
याच कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष मिलिंद फंड यांनी संभाजीराव किर्दाक यांची कनिष्ठ विभागाचे प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर करून त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवली तसेच त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना मराठी विभागप्रमुख प्रा. नितीन तळपाडे यांनी केली. कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने प्रा. मुन्नेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. कृष्णा कांबळे यांनी केले.