करमाळा प्रतिनिधी  

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासह मंजुरीसाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेशी चर्चा केली असून या कामाबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पुढील कार्यवाही साठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली. नागपूर येथे सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा मतदार संघातील अनेक प्रलंबित प्रश्न सादर केले असल्याचे समजते. आज त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रत्यक्षात भेट घेतली व चर्चा करुन रिटेवाडी उपसा बाबत निवेदन दिले. याबाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की, नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन

योजनेच्या सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला असला तरी आर्थिक तरतुद व पुढील कार्यवाही साठी कार्यालयीन स्तरावरुन विलंब होत असल्याचे आपण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समोर‌ मांडले. कुकडी कालवा सल्लागार समितीच्या अहिल्यानगर येथे झालेल्या बैठकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना काम तातडीने करावे अशा सुचना दिल्या होत्या. नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामाबाबत आपण अविरतपणे पाठपुरावा चालू ठेवला असुन आज सभागृहात या विषयावर औचित्यपूर्ण मुद्दा मांडण्यास लेखी निवेदन दिले होते. परंतु मंजुरी घेण्यात येणाऱ्या विधेयकांची संख्या जास्त असल्याने व नियम २९३ अन्वये आणखी काही सदस्य बोलणे बाकी असल्याने आजचे औचित्यपूर्ण मुद्दे स्थगित करण्यात आले आहेत. परंतु तरीही आपण आज उशीरा अथवा उद्या नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या विषयावर सभागृहात बोलण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहोत. जेणेकरून नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या पुढील कामास गती मिळेल. आज आपण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समक्ष हा विषय मांडुन करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना किती महत्वाची आहे याची बाजु मांडली आहे. तसेच अधिवेशन काळातच या विषयाबाबत एका बैठकीची मागणीही आपण केली असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *