
करमाळा प्रतिनिधी
राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे चालू असुन करमाळा विधानसभा मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न मांडण्याची संधी आज आमदार नारायण आबा पाटील यांना मिळणार असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी दिली. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की, चालू अधिवेशनात आमदार नारायण आबा पाटील यांनी तब्बल ३९ महत्वाचे प्रश्न तारांकीत स्वरुपात मांडले जावेत अशी मागणी केली होती तर १८ लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी लेखी मागणी केली होती. परंतु अधिवेशनाचा कालावधी एका आठवड्याने कमी झाल्याने आता यातील सर्वच प्रश्नावर सभागृहात बोलायला मिळणार नाही पण या प्रश्नांची लेखी उत्तरे संबंधित मंत्री यांच्याकडुन मिळतील. आज सभागृहात नियम २९३ अन्वये चर्चा असुन यात आमदार नारायण आबा पाटील हे नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या बाबत बोलणार आहेत. रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण तातडीने केले जावे व यास मंजुरी दिली जावी याबद्दल ते आवाज उठवणार आहेत.

नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना हा आमदार नारायण आबा पाटील यांचा ड्रिम प्रोजेक्ट असल्याने मागील अधिवेशनात सुध्दा त्यांनी सभागृहात हा प्रश्न मांडला होता. शिवाय या अधिवेशनात नागपुर येथेच या प्रश्नावर एक बैठक लावावी अशी मागणी सुध्दा आमदार नारायण आबा पाटील यांनी केली आहे. तसेच आज नियम २९३ अन्वये करमाळा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आणखी वाढीव अनुदान शेतकऱ्यांना मिळावे यासाठी ते मतदारसंघातील शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहेत. तसेच आज तारांकीत प्रश्नावर चर्चा करताना करमाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एक शेतकरी भवन उभारले जावे यावर बोलणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेतुन करमाळा येथे शेतकरी भवन मंजुर करावे अशी मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली आहे. यामुळे आज करमाळा तालुक्यातील महत्वाचे प्रश्न आमदार नारायण आबा पाटील सभागृहात मांडणार असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी दिली आहे.