
करमाळा प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक तीनमधील विकासाचा प्रश्न दिवसेंदिवस गहन होत चालला असून, स्थानिक नागरिक आणि युवा वर्ग याबाबत आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार आवाज उठवत आहेत. मागील पाच वर्षांपासून नगरसेवकांनी या भागातील मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याची भावना नागरिकांमध्ये प्रबळ आहे.
या संदर्भात गोपाल पांडुरंग वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “प्रभाग क्रमांक तीनमध्ये गेल्या कार्यकाळात कुठल्याही प्रकारचा ठोस विकासकामाचा मागोवा दिसत नाही. जे काही कामे केल्याचा दावा केला जातो, ती फक्त कागदावरची नोंद आहे. प्रत्यक्षात प्रभागाचा कुठलाही विकास झालेला नाही.”

ते पुढे म्हणाले, “नालेसफाई, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा आणि रस्त्यांवरील अंधार या समस्या आजही जशाच्या तशा आहेत. नगरसेवकांनी निवडणुकीच्या वेळी दिलेली मोठमोठी आश्वासने फक्त बोलकीच ठरली. प्रत्यक्षात नागरिक आजही मूलभूत सुविधांसाठी धडपडत आहेत.”
गोपाल वाघमारे यांनी पुढे जनतेला आवाहन केले की, “जनतेने आता डोळसपणे विचार करून खरे विकासाभिमुख नेतृत्व निवडावे. कारण प्रभाग क्रमांक तीनला खऱ्या अर्थाने विकासाची गरज आहे. खोट्या आश्वासनांवर नाही तर कामावर विश्वास ठेवणाऱ्या नेतृत्वाची निवड करणे ही काळाची गरज आहे.”
त्यांनी पुढे नमूद केले की, “विकासाचे राजकारण व्हायला हवे. लोकांना खोटी स्वप्ने दाखवून आता काही उपयोग नाही. जनता जागृत झाली आहे. या वेळची निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर होईल, अशी चर्चा जनतेमध्ये जोरदार सुरू आहे.”
सध्या करमाळा शहरात आणि सोशल मीडियावर प्रभाग क्रमांक ३ मधील समस्या, अडचणी आणि दुर्लक्षित भागांबद्दल तरुणाई मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आणि पोस्ट्सच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत प्रभागातील मतदारांचा कल ‘विकास आणि पारदर्शकते’कडे झुकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.