
करमाळा प्रतिनिधी
करमाळ्याच्या वीर शिवाजी महाराज तलवारबाजी ग्रुपच्या दोन तरुण खेळाडूंनी पुणे विभागीय स्पर्धेत चमक दाखवत राज्यस्तरावर झेप घेतली आहे.
महात्मा गांधी विद्यालय, करमाळा येथील श्रुतिका नागनाथ बोळगे (14 वर्षे, इप्पी प्रकारात प्रथम क्रमांक) आणि आण्णासाहेब जगताप विद्यालय, करमाळा येथील ईश्वरी महेश राऊत (17 वर्षे, इप्पी प्रकारात चतुर्थ क्रमांक) यांनी महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या वतीने आयोजित पुणे विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या दोन्ही खेळाडूंची आता छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेदरम्यान श्रुतिका आणि ईश्वरी यांनी अप्रतिम कौशल्य, एकजूट आणि जिद्दीचे प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीपासूनच त्यांनी दमदार खेळ दाखवत सलग सामने जिंकले आणि पुणे विभागातील बलाढ्य खेळाडूंना पराभूत करत आपल्या श्रेष्ठतेची छाप उमटवली.
त्यांच्या विजयी प्रवासात पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील विविध शाळांतील खेळाडूंना त्यांनी पराभूत केले. या यशामागे महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश काटुळे सर, सोलापूर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव दिपक शिंदे सर, तसेच पवन भोसले सर, राहुल मेहत्रे, अक्षय माने, नागनाथ बोळगे सर, संतोष झिंजाडे सर, सुरज वायकुळे सर आणि अभिषेक कुतवळ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या दोन्ही खेळाडूंच्या यशामुळे करमाळा तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत असून राज्यस्तरावरही त्यांच्याकडून भव्य कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.