करमाळा प्रतिनिधी

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जागरूकतेची नवी लाट दिसून येत आहे. अनेक नागरिकांनी एकमुखाने मागणी केली आहे की, गेल्या पाच वर्षांत वार्डात काम केलेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व  नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळातील विकासकामांचा सविस्तर लेखा-जोगा नागरिकांसमोर मांडावा.

नागरिकांचे म्हणणे आहे की, “निवडणुकीच्या वेळी आश्वासनांची आतिषबाजी केली जाते, पण प्रत्यक्षात कोणत्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकाने वार्डात नेमकी कोणती कामे केली, किती निधी वापरला आणि कोणती कामे अपूर्ण राहिली याची माहिती मिळणे आवश्यक आहे.”

अनेक ठिकाणी रस्ते, पाण्याचा प्रश्न, गटारींची दुरावस्था, तसेच सार्वजनिक सोयीसुविधांचा अभाव या कारणांमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे नागरिकांचा आग्रह आहे की, पूर्वीच्या नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळातील विकासकामांचा खुला अहवाल सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करावा, जेणेकरून मतदारांना योग्य निर्णय घेता येईल.

स्थानिक सामाजिक संघटना आणि युवक मंडळांनीदेखील या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. “लोकशाहीत उत्तरदायित्व आवश्यक आहे. नागरिकांच्या पैशातून झालेले प्रत्येक काम पारदर्शकपणे समोर यायला हवे,” असे मत युवक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

आगामी निवडणुकीत मतदार विकास आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांची परीक्षा घेणार, हे निश्चित आहे. त्यामुळे जुन्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी आपल्या कामांचा प्रामाणिक अहवाल सादर करून लोकांचा विश्वास जिंकावा, अशी नागरिकांची ठाम भूमिका आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *