
पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन : धर्मादाय कार्यालय सोलापूरचा सामाजिक संस्थांना पुढाकार घेण्याचा आग्रह
सोलापूर, (जिमाका) दि. 1 : अलीकडील मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून सोलापूर जिल्ह्यातही पावसाने मोठे नुकसान केले आहे. हजारो नागरिक बेघर झाले असून शेती, जनावरे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना तातडीने मदतीची गरज असून सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि दानशूर नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे.

धर्मादाय कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, पूरग्रस्तांना अन्न, वस्त्र, पिण्याचे पाणी, औषधे आणि तात्पुरता निवारा यासारख्या मूलभूत गरजांची पूर्तता अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक संस्थांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून या संकटाच्या काळात पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, हीच काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
इच्छुक संस्था व व्यक्तींनी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून मदतकार्य हाती घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच धर्मादाय रुग्णालयांनी आवश्यक ठिकाणी वैद्यकीय मदत पुरवावी, असे निर्देशही पत्रकात देण्यात आले आहेत.
…………………….
आधार नोंदणी व अद्ययावत सेवांसाठी सुधारित दर निश्चित : 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
सोलापूर, (जिमाका) दि. 1 : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, दिल्ली यांच्या सूचनेनुसार आधार नोंदणी व अद्ययावत सेवा तसेच अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) सेवांसाठी सुधारित दर निश्चित करण्यात आले असून, हे दर दि. 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू करण्यात आले आहेत. याबाबत माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सुधारित दर पुढीलप्रमाणे आहेत :
– नवीन आधार नोंदणी : निशुल्क
– बाल आधार (5 वर्षानंतर) अद्ययावत करणे : निशुल्क
– अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (5–7 व 15–17 वयोगट) : निशुल्क
– अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (7–15 वयोगटासाठी, 1 वर्षासाठी) : निशुल्क
– अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (17 वर्षावरील) : ₹125/- (GST सह)
– सर्वसामान्य बायोमेट्रिक व डेमोग्राफिक अपडेट (नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर) : ₹125/- (GST सह)
– फक्त डेमोग्राफिक अपडेट : ₹75/- (GST सह)
– POA/POI दस्तऐवज अपडेट : ₹75/- (GST सह)
– SSUP पोर्टलद्वारे POA/POI दस्तऐवज अपडेट : ₹75/- (GST सह)
– ई-आधार डाऊनलोड व कलर प्रिंट : ₹40/- (GST सह)
सर्व आधार नोंदणी केंद्रांनी वरील दरानुसारच सेवा द्याव्यात. कोणत्याही केंद्रचालक ऑपरेटरने अधिक रक्कम आकारल्यास नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करावी. तसेच UIDAI च्या टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करून किंवा help@uidai.gov.in या ईमेलवर तक्रार नोंदवावी.
नागरिकांनी फिजिकल आधारऐवजी Mask Aadhaar चा वापर करावा, जेणेकरून आधारचा गैरवापर टाळता येईल, असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे
………………….
दिव्यांग मुलांसाठी विशेष UDID कार्ड व मोफत आरोग्य शिबिर : 3 ऑक्टोबर रोजी सोलापुरात आयोजन
सोलापूर, (जिमाका) दि. 1 : जिल्ह्यातील 6 ते 18 वयोगटातील दिव्यांग मुलांना त्वरीत UDID (विशिष्ट दिव्यांग ओळखपत्र) कार्ड मिळावे आणि त्यांना आवश्यक आरोग्य सेवांचा लाभ मिळावा, यासाठी एक विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर; जिल्हा विधी सेवा प्राधिकरण; जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, महिला व बालकल्याण समिती आणि छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
हे विशेष शिबिर शुक्रवार, दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, कर्णिक नगर, सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात UDID कार्ड नोंदणीसह मोफत आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
दिव्यांग मुलांना त्यांच्या हक्कांसह शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा उद्देश या उपक्रमामागे असून शासन दिव्यांग सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे. हा उपक्रम त्याच प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे.
जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी, विशेषतः पालकांनी, या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.