
करमाळा प्रतिनिधी
आज मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा सदस्य ओबीसी उपसमिती छगन भुजबळ यांची दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, भाजपा नेते करमाळा प्रा. रामदास झोळ सर यांनी भेट घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेप्रमाणे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सरसकट लागू करावी याबद्दल पत्र देऊन विनंती केली. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता ही योजना खुला प्रवर्ग EBC तसेच EWS च्या विद्यार्थ्यांना शहरी व ग्रामीण भागासाठी सरसकट लागू होते. त्याची उत्पन्न मर्यादा ही रक्कम ८ लाख रुपये एवढी असून सदर योजना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे. याउलट इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ मिळत असून ही योजना फक्त शहरी भागासाठीच लागू असून उत्पन्न मर्यादा अट ही रक्कम २ लाख ५० हजार रुपये एवढी आहे तसेच सदर योजनेसाठी प्रति जिल्हा फक्त ६०० विद्यार्थी मर्यादा असून त्याचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करावा लागतो.
तरी अशा पद्धतीने दोन्ही वसतिगृह योजनांमध्ये असलेली तफावत दूर करून आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थी आणि पालकांवर असलेलं आर्थिक संकट टाळावं अशी विनंती करण्यात आली.
