करमाळा प्रतिनिधी

बारा वर्षात एकही कार्यकर्ता निवडून आणता आला नाही – सुनील तळेकर

बारा वर्षात एकही कार्यकर्ता निवडून आणता आला नाही, नेता म्हणून संजयमामा फेल असल्याचा दावा आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटील यांच्या पॅनलने माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पॅनलचा सर्व उमेदवारांना पराभुत करुन विजय संपादन केला. यावर प्रतिक्रिया देताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले की, संजयमामा शिंदे हे बारा वर्षे झाले करमाळा तालूक्यातील राजकारणात सक्रिय आहेत. परंतू या दरम्यानच्या कालावधीत त्यांनी शिंदे गटाचे नेतृत्व करत असताना एकाही कार्यकर्त्याला तालूकापातळीवरील निवडणुकीत विजय मिळवून‌ दिला नाही. ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे. आजपर्यंत करमाळा पंचायत समिती, जिल्हा परिषद, आदिनाथ व मकाई कारखाना या तालुक्यातील महत्वाच्या सत्तेत शिंदे गटाचा एकही पदाधिकारी निवडून आलेला नाही. यावरुन माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे नेतृत्व कुचकामी ठरले आहे. या उलट आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा पंचायत समिती सभापती, उपसभापती तर जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच आता आदिनाथ कारखाना या महत्वांच्या ठिकाणी करमाळा तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन स्वतः प्रचार करुन निवडून आणले. माजी आमदार संजयमामा शिंदे हे सध्या स्वतः निवडून येण्यास असमर्थ आहेतच पण ते आपल्या स्वतःच्या गटातील कार्यकर्ता निवडुन आणण्यात सुध्दा अपयशी ठरले आहेत. तालुक्यातील वरीष्ठ नेते मंडळी बारा वर्षापुर्वी तालूक्यातील महत्वाच्या पदावर असताना शिंदे गटात आलेली आहेत. आज बारा वर्षे झाली तरी केवळ संजयमामा शिंदे यांची पालखी वाहण्यातच कार्यकर्त्यांनी किती वर्षं धन्यता मानायची हा महत्त्वाचा प्रश्न उरुन राहत आहे. यामुळे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी स्वतःला सोलापूर जिल्ह्याचे नेते म्हणवून घेणे सोडून द्यावे. मोहिते पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष, दुध संघ अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री पदापर्यंत पोहचवले आहे. यामुळे संजयमामा शिंदे यांनी उगीच मोहिते पाटील यांची बरोबरी करणे सोडुन द्यावे. कुठे तरी थंड हवेच्या ठिकाणी जाऊन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी विधानसभा व आदिनाथ या दोन्ही निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करावे असा मार्मिक टोलाही सुनिल तळेकर यांनी लगावला.

………………………..

माजी आमदार संजयमामांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे याची विरोधकांना पोटदुखी : संजयमामांच्या पाठीशीच खरा जनाधार – ॲड. अजित विघ्ने (प्रवक्ता शिंदे गट)

करमाळा विधानसभेत आणि आदिनाथ कारखाना निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे गट पराभुत झाल्यामुळे पाटील गटाचे प्रवक्ते यांनी आज केलेली टिका विजयाच्या उन्मादाने हुरळुन केलेली असून, माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा गट आता तालुक्यात भक्कम झाल्याचेच स्पष्ट होत आहे. एकट्या संजयमामांना रोखण्यासाठी तालुक्यातील मातब्बर असणाऱ्या मोहिते – पाटील, जगताप, बागल आणि पाटील गटाला एकत्र यावे लागले. परंतु ही अभद्र युती फार काळाची नसेल. आजपर्यंत झालेल्या निवडणुका पाहता मामांचे मतदान वाढतच असल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणुकात हार जीत असतेच, परंतु विधानसभेनंतर माझी करमाळा तालुका हीच कर्मभूमी कायम राहील हा ठाम निर्णय मामांनी स्पष्ट केल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

मार्केट कमिटीच्या निवडणुकीत देखिल संजयमामांनी यापुर्वी चंद्रकांत सरडे यांना संधी दिली होती, केत्तुरचे राजेंद्रसिंह पाटील यांना दुध संघावर संधी दिली आहे. यापुर्वी विकासबापु गलांडे यांनाही मामांनी पदाची संधी दिलेली आहे. ॲड. राहुल सावंत यांना जिल्हा नियोजन समितीवर व अन्य कार्यकर्त्यांना विविध अशासकीय समित्यांवर मामांनीच पदे दिली आहेत. याशिवाय आजपर्यंत झालेल्या निवडणुकात कार्यकर्त्यांना बळ दिलेले आहे. भविष्यात देखिल होणाऱ्या निवडणुका शिंदे गट पुर्ण ताकदीने लढणार आहे. त्यामुळे पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांनी फुकटचे सल्ले देण्याचे टाळून आता आदिनाथ कारखाना चालु करून शेतकरी सभासद व कामगारांना न्याय देण्याबाबत चिंतन करावे.

आदिनाथमधे निवडून आलेल्यांनी संगोबा येथे आदिनाथ महाराजांची घेतलेली शपथ लक्षात ठेवावी व कामकाज योग्य रित्या करावे. केवळ विषय दुसरीकडे वळवून मुख्य विषय बाजूला करण्याचे नेहमीचे तंत्र थांबवावे. आमचे नेते संजयमामा शिंदे हे सक्षम नेतृत्व असून भविष्यात नक्कीच पूर्ण ताकदीने करमाळ्याच्या प्रत्येक निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्याबरोबर राहतील याचा करमाळा तालुक्यातील जनतेला विश्वास आहे. तालुक्यातील अनेक युवक नेते मंडळी लवकरच संजयमामा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मामांच्या गटाची ताकद प्रत्येक निवडणुकीतून दिसुन येत आहे.  

आदिनाथच्या निवडणुकीत देखिल जवळपास सात हजार मतांपर्यंत एकट्याने मजल मारली आहे. झालेल्या मतदानापैकी 41 टक्के मते संजय मामांना मिळाले आहेत तर 4 गट आणि त्यांच्यासोबत एकत्र आलेले उपगट यांना मिळून फक्त 48% मतं आहेत यावरूनच कोणाची ताकद किती आहे हे दिसून येते. त्यामुळेच निवडून येऊन सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाही आता आदिनाथ कारखाना व्यवस्थित चालवून दाखवावा हीच अपेक्षा आहे. त्यामुळे फुकटचे सल्ले देऊ नये असे आवाहान प्रवक्ते ॲड. अजित विघने यांनी केले आहे.

…………………………..

सभासदांनी दिलेला कौल मान्य करावा : आपला पराभव लपविण्यासाठी काही जणांकडून बागलांवर बिनबुडाचे आरोप – चिंतामणी जगताप

श्री आदिनाथ सह साखर कारखान्याची निवडणूक झालेली असून पराभवामुळे स्वतःची इच्छा पूर्ण न झाल्याने काहीजण बिनबुडाचे आरोप करत आहेत. सभासदांनी दिलेला कौल सर्वांनी मान्य करावा उगाच आपला पराभव दडविण्यासाठी बागल गटावर टीका करून काही जण स्वतःचे हसू करू नये

बागल गटाच्या वतीने या निवडणुकीपुरते थांबण्याचा निर्णय घेतला होता तो तंतोतंत पाळला असून निवडणूक प्रक्रियेत बागल गट अलिप्त राहिला असून कसलाही सहभाग नसताना काहीजण बागल गटावर तोंडसुख घेत आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करून स्वतः सभासदांना विश्वास देण्यास कमी पडलो हे मान्य करावे असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांनी केले आहे.

पुढे बोलताना जगताप म्हणाले की, अडचणीत असलेला आदिनाथ सुरू करण्यासाठीच्या प्रयत्नात आमच्या नेत्या रश्मी बागल व नेते दिग्विजय बागल यांनी सहभाग नोंदवत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते मोळी टाकून कारखाना सुरू करण्यात मोलाचा सहभाग नोंदवला होता. त्यावेळी 76000 टन क्रशिंग झाले होते व ऊस वाहतूक तोडणीदार यांचे पेमेंट देखील केले होते. असा चालू स्थितीतील आदिनाथ सहकारी कारखाना प्रशासनाने प्रशासक मंडळाकडे दिला त्यानंतर कारखाना सक्षमपणे का चालवू शकला नाही याची उत्तरे तत्कालीन प्रशासकांनी तालुक्याला द्यावीत. तेव्हा तालुक्यातील शेतकरी सभासदांना गृहीत धरून स्वतःचे अपयश झाकण्यासाठी सवंग विधाने ना करता सभासदांनी दिलेल्या कौलाचा मान राखावा.

निवडणुकीपासून अलिप्त असूनही ही निवडणूक बागल या नावाभोवतीच फिरली. शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वकौशल्याची चुणूक यानिमित्ताने तालुक्याने पहिली आहे. याचाच पोटशूळ उठल्याने काही मंडळी बिनबुडाच्या प्रतिक्रिया देत आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *