
करमाळा प्रतिनिधी
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील कोंढेज हा सर्वात मोठा तलाव आहे.या तलावावरती वरकटणे आणि कोंढेज ही दोन गावे अवलंबून आहेत. कोंढेज ५०२ हेक्टर व वरकटणे ७९२ हेक्टर असे १२९४ हेक्टर क्षेत्र दहिगाव योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये येते. यापूर्वी दहिगाव योजनेचे रब्बी आवर्तन ५० दिवस चालूनही कोंढेज तलावाला पाणी मिळालेले नव्हते. परवा दि.२० मार्चपासून दहिगाव चे उन्हाळी आवर्तन सुरू होत आहे. या आवर्तनाचे पाणी कोंढेज तलाव व रब्बी आवर्तनामध्ये वंचित राहिलेल्या ५ हजार हेक्टर क्षेत्राला प्राधान्याने पाणी द्यावे अशी मागणी कोंढेज गावचे नागपूर महापौर केसरी पैलवान अनिल फाटके यांनी केली आहे.

याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की,कोंढेज व वरकटणे येथील ग्रामस्थांनी पाच लाख लोक वर्गणी गोळा करून पाच वर्षांपूर्वी कोंढेज तलावात पाणी आणलेले आहे.तलावातील पावसाच्या पाण्याच्या भरोशावर व नियमित सुटणाऱ्या दहिगाव योजनेच्या आवर्तनामुळे दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी केळी व ऊस या बारमाही पिकांची लागवड केलेली असून सध्या पाण्याअभावी ही पिके आता सुकू लागलेली आहेत. उन्हाळी आवर्तनाचे हे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही तर शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांची नुकसान होईल त्यामुळे उन्हाळी आवर्तनाचे पाणी प्राधान्याने कोंढेज तलावाला द्यावे अशी आग्रही मागणी ग्रामस्थांच्या वतीने पैलवान फाटके यांनी केली आहे.

………….
तुम्ही पाणी पूजन करा. लोक तुमचे पूजन करतील… दोन वर्षांपूर्वी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यकाळात तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर त्याचे पाणी पूजन करण्यावरून शिंदे गट व पाटील गट यांच्यात वाद झाला होता. शिंदे गटाने पाणी आणूनही त्याचे पूजन पाटील गट करत होता हे त्या मागील कारण होते. या पार्श्वभूमीवर बोलताना पै. फाटके म्हणाले की, आता आमदार पाटील आहेत. त्यांनी पाणी आणावे, तलाव ओव्हर फ्लो करावा त्या पाण्याचे पूजनही त्यांनीच करावे. त्याची आंम्हाला काही अडचण नाही, उलट आनंदच होईल.पाणी आणणाऱ्यांचे लोक पूजन करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.