करमाळा प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर २ या शाळेत 08 मार्च अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सरपंच सुवर्णा मोरे, उपसरपंच तेजश्री कोकरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्य, तसेच गावातील महिलांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक

बाळासाहेब बोडखे यांनी कुटुंबातील, समाजातील स्त्री शिक्षणाचे महत्त्व, तिचे कुटुंबात असणारे निर्णायक योगदान, त्यातून स्त्रियांचे स्वतःच्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष, स्त्रियांनी स्वतःकडे आवर्जून लक्ष देत जोपासावयाचे स्वतःचे छंद, मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात आपले करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबतची भूमिका, बदलत्या काळात स्त्रियांची गरुड झेप अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित सर्व महिलांमध्ये संगीत खुर्ची, तळ्यात

मळ्यात, बादलीत चेंडू एकत्र करणे, महिलांची जोडी करून वस्तू गोळा करणे, हात न लावता कपाळावरील बिस्किट खाणे अशा वेगवेगळ्या मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या प्रत्येक स्पर्धे मागे जसे मनोरंजन आहे तसेच मनाची एकाग्रता, शारीरिक क्षमता यांनाही तितकेच महत्त्व आहे. या खेळांच्या माध्यमातून ती कशी विकसित होते याबाबतचे मार्गदर्शन देखील आवर्जून बोडखे यांनी प्रत्येक स्पर्धेनंतर उपस्थितांना सांगितले.

यावेळी विजयी स्पर्धकांना गुलाबाचे रोप देऊन सरपंच सुवर्णा मोरे, उपसरपंच तेजश्री कोकरे तसेच उपस्थित महिलांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

महिला दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये उपस्थित असणाऱ्या प्रत्येक महिलेला खातगाव ग्रामपंचायतच्या वतीने गुलाबाचे रोप भेट म्हणून देण्यात आले.

तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष झेंडे, सदस्य गणेश कोकाटे व समाधान तानवडे यांच्यावतीने उपस्थित सर्वांसाठी गोड जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांना सहशिक्षक किरण जोगदंड, गावातील युवक पप्पू पवळ, शाळेतील सर्व विद्यार्यांनी अनमोल सहकार्य केले.

सातत्याने सर्वांगीण शिक्षणाचा आणि पालकांना शिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेण्याचा आग्रह धरणाऱ्या या शाळेत केवळ पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. तरी देखील शाळेमध्ये प्रत्येक उपक्रम तेवढ्याच ताकतीने राबवत असल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी जयवंत नलावडे, शि.वि.अ. नितीन कदम, केंद्र महावीर गोरे तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे व सहशिक्षक किरण जोगदंड यांचे विशेष कौतुक केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *