
करमाळा प्रतिनिधी
केम गावातील युवकांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या ‘आपले केम स्वच्छ केम’ ग्रामस्वच्छता अभियानाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, या स्वच्छता मोहिमेचे करमाळा व दक्षिण सोलापूर तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांसह मान्यवरांनी कौतुक केले.
या स्वच्छता अभियानात करमाळा तालुक्याचे गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत तसेच छत्रपती शासन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राणजीत गवंडी यांनी उपस्थित राहून युवकांसोबत प्रत्यक्ष श्रमदान केले.

यावेळी डॉ. अमित कदम यांनी केम गावातील युवकांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छतेची ही संकल्पना सुरू केल्याबद्दल युवकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ही संकल्पना केवळ केम गावापुरती मर्यादित न राहता संपूर्ण करमाळा तालुक्यात राबविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच या अभियानासाठी प्रशासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची गरज भासल्यास बिनधास्तपणे कळवावे, आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, केम गावातील युवकांनी सुरू केलेली ही स्वच्छता चळवळ पुढील आठ दिवसांत दक्षिण सोलापूर तालुक्यात सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला.
छत्रपती शासन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राणजीत गवंडी यांचे सहकारी टीम उपाध्यक्ष दादासाहेब तनपुरे यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन युवकांचे कौतुक केले. प्रत्येक युवकाने स्वच्छतेच्या कार्यात सहभागी झाले पाहिजे. ही चळवळ केवळ गावापुरती मर्यादित न राहता तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात राबविली गेली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. गड-किल्ले स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातूनही स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्वच्छता अभियानाला ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी वैभव तळेकर यांचेही नेहमीच मोलाचे सहकार्य लाभत आहे. स्वच्छता मोहिमेसाठी आवश्यक असणारे सर्व प्रशासकीय सहकार्य करण्याची तसेच दर रविवारी दोन तास गावासाठी श्रमदान करण्यासाठी उपस्थित राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
केम गावातील युवकांनी सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाला दिवसेंदिवस युवकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. स्वतःच्या गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून युवक दर रविवारी श्रमदान करत असून, ‘स्वच्छतेसाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सहभाग’ हा संदेश या अभियानातून दिला जात आहे.
केम गावातून सुरू झालेली ही स्वच्छतेची चळवळ आता तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विविध भागांत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला असून, इथून केम गावातील स्वच्छता मोहिमेला आणि करमाळा तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी वर्ग प्रशासन सहभाग नोंदवणार आहेत. ‘आपले केम स्वच्छ केम’ अभियान हे स्वच्छ, सुंदर आणि आदर्श गावाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.