करमाळा प्रतिनिधी

राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने दि. ०६/०३/२५ रोजी राज्यातील संचालक मंडळाची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. यानुसार तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून दि. १०/०३/२५ पासून १९/०४/२५ पर्यंत ही निवडणूक प्रक्रिया चालणार असल्याची माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अमोल भोसले (भू संपादन अधिकारी-१, सोलापूर) हे श्री आदीनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पाडणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी भोसले यांनी एकूण सहा मतदार संघातून २१ सदस्यांच्या निवडणुकीकरिता विविध टप्पे तयार केले असून दि. १०/०३/२५ ते दि. १७/०३/२५ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात (तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय करमाळा) नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून प्राप्त नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. १८/०३/२५ रोजी छाननी प्रक्रिया होणार असून दि. १९/०३/२५ रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात विधी ग्राह्य नामनिर्देशन पत्रांची सूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. १९/०३/२५ ते ०२/०४/२५ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार असून दि. ०३/०४/२५ रोजी सकाळी ११ वाजता अंतिम विधी ग्राह्य नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच दिवशी उमेदवारांना निशाणी वाटप करण्यात येणार आहे.

जेऊर, सालसे, पोमलवाडी, केम, रावगाव अशा पाच ऊस उत्पादक सभासद गटांतून प्रत्येकी ३ प्रमाणे एकूण १५ प्रतिनिधी तर उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी- १, अनु. जाती/अनु. जमाती प्रतिनिधी (१), महिला राखीव प्रतिनिधी (२), इतर मागासवर्गीय जाती प्रतिनिधी (१) व भटक्या वि. जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग (१) अशा एकूण ६ मतदार संघांतून एकूण २१ प्रतिनिधी या प्रक्रियेद्वारे निवडण्यात येणार आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *