
करमाळा प्रतिनिधी
बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू,
झाडे वेली पशू पाखरे यांशी गोष्टी करू
ग. दि. माडगूळकरांच्या या कवितेमध्ये निसर्गातील घटकांचे आपले गुरू म्हणून खूप सुंदर असे वर्णन केले आहे. निसर्गातील प्रत्येक घटकांपासून आपल्याला काहीना काही शिकायला मिळत असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु धर्मवीर संभाजी विद्यालय, गौंडरेने विद्यार्थ्यांना ग. दि. माडगूळकरांची ही कविता प्रत्यक्षात जगण्याची संधी उपलब्ध करून दिली. पर्यावरण सेवा योजने अंतर्गत शाळेने पक्षी निरीक्षणाचा उपक्रम राबवलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील विविध पक्षांची ओळख करून देणे व परिसंस्थामधील महत्त्व अधोरेखित करणे हा पक्षी निरीक्षणाचा उद्देश होता.

यामध्ये विद्यालयातील इयत्ता ९ वीच्या ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सभोवतालच्या एकूण ३४ प्रकारच्या पक्षांची नोंद केली. यामध्ये कापशी घार, वेडा राघू, दयाळ, गप्पीदास, खंड्या, चष्मेवाला, ग्रे हेरॉन, गाय बगळा इ. पक्षांची विद्यार्थ्यांनी नोंद केली. याचबरोबर या दरम्यान विद्यार्थ्यांनी पी ब्लू, कॉमन मॉरमॉन, लाईम स्वॅलोटेल इ. फुलपाखरे तसेच दिवड या सापाची तर शामिलियन या सरड्या ची नोंद विद्यार्थ्यांनी केली.

या उपक्रमाच्या माध्यामातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण घेतले. याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील पक्षांची ओळख झाली व पुस्तकातील धडे प्रत्यक्षात शिकण्याची संधी मिळाली. या उपक्रमास पर्यावरण अभ्यासक श्री गणेश सातव व पर्यावरण सेवा योजनेचे राज्य समन्वयक जगदीश ठाकूर यांचे मार्गदर्शन मिळाले. पर्यावरण सेवा योजना प्रमुख हरिदास काळे यांच्या संकल्पनेतून व नियोजनामुळे सदर उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. यावेळेस विद्यालयाचे मुख्याध्यापक बापू निळ व प्रयोगशाळा परिचर प्रकाश साळवे यांचे या उपक्रमास सहकार्य मिळाले.
