खातगाव न.2 शाळेत बालिकादिरानिमित्त आम्ही सावित्रीच्या लेकी कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा:- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं. 2 या शाळेत बालिका दिनाचे औचित्य साधून आम्ही सावित्रीच्या लेकी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून मुलींच्या शिक्षणाबाबत पालकांचे प्रबोधन करण्यासाठी सावित्रीबाईंचे स्री शिक्षणातील महान योगदान आणि या शिक्षणाच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी यश खेचून आणले अशा यशस्वी महिलांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या शाळेत शेतकरी, शेतमजूर आणि मच्छीमारांची मुलं शिकतात. केवळ परिस्थितीमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये, त्यांचा शिक्षणाबाबतचा आत्मविश्वास वाढावा या विचाराने शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी आपले सहकारी शिक्षक किरण जोगदंड यांना सोबत घेऊन आम्ही सावित्रीच्या लेकी यशोगाथा हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला.
वडील लॉन्ड्री अर्थात इस्त्री दुकान चालवणारे असून सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन डॉक्टर झालेल्या डॉक्टर सोनाली पवार तसेच शेतकरी कुटुंबातून यशस्वी वाटचाल करत डॉक्टर झालेल्या आणि समाजसेवेमध्ये अग्रगण्य असणाऱ्या भिगवण येथील नामांकित स्रीरोग तज्ञ डॉक्टर पद्मा खरड यांचे मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी चांगले शिक्षण, घरच्यांचा पाठिंबा आणि आपले यश खेचून आणण्यासाठी असणारे अफाट प्रामाणिक प्रयत्न हेच तुम्हाला यशस्वी बनवतात हे डॉक्टर सोनाली पवार यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिले.
शेतकरी कुटुंबात असून सुद्धा घरच्यांनी शिक्षणाबाबत घेतलेली धाडसी भूमिका आणि कमी वयात गाव सोडून बाहेरगावी होस्टेलला राहून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपण डॉक्टर कसे झालो हा इतिहास डॉक्टर खरड यांनी सर्वांसमोर मांडला. एवढेच नाही तर चांगले शिक्षणामुळे आपली समाजातील प्रतिमा कशी उंचावते, आपली कौटुंबिक आर्थिक परिस्थिती सुद्धा कशी सुधारते हेही पटवून दिले.
या दोन्ही यशस्वी डॉक्टरांनी कुटुंबातील सर्वांनीच जोपासणे आवश्यक असणाऱ्या चांगल्या सवयी, आहार , नियमित व्यायाम, मोबाईलचा कमीत कमी वापर तोही चांगल्या कामासाठी, मुलींच्या शिक्षणा बाबत घरच्यांचा सकारात्मक दृष्टिकोन अशा विविध बाजूने उपस्थित सर्व महिला वर्गाला, विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. एवढ्या स्वच्छ आणि रम्य वातावरणामध्ये तुम्हाला शिक्षण भेटते हे तुमचे नशीब आहे असे म्हणत त्यांनी शाळेच्या हिरव्यागार रम्य वातावरणाचेही भरभरून कौतुक केले. यावेळी शाळेतील विद्यार्थिनी त्रिवेणी रणसिंग आणि ज्ञानेश्वरी कोकाटे यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याची माहिती आपल्या भाषणातून मांडली.
यावेळी खातगावच्या सरपंच सुवर्णा मोरे, शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे सहशिक्षक किरण जोगदंड, अंगणवाडी सेविका शालन आरदड, ग्रामपंचायत सदस्या कौशल्या रणसिंग शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आणि उपस्थित महिला वर्गाच्या हस्ते या दोन्ही डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
शाळेमध्ये केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर पालकांनाही शिक्षणाबाबत जागृत करणारा, त्यांचे प्रबोधन करणारा हा आम्ही सावित्रीच्या लेकी हा उपक्रम राबविल्याबद्दल गट शिक्षणाधिकारी जयवंत नलावडे, शि.वि.अ.नितीन कदम, केंद्रप्रमुख महावीर गोरे, सरपंच सुवर्णा मोरे,शा.व्य.स. अध्यक्ष संतोष झेंडे तसेच सर्व ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे व उपशिक्षक किरण जोगदंड यांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाला गावातील महिला, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालक प्रतिक्रिया…
आम्ही पहाटे उठून मासे पकडायला पाण्यात जातो. आमचा दिवस नदीलाच जातो. त्यामुळे आम्हाला आमच्या मुला मुलींकडे फारसे लक्ष देता येत नाही, आज डॉक्टरांनी जे व्यायामाचे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले आहे त्यामुळे आजपासून मी नक्कीच माझ्या मुला मुलींना योगासने, व्यायाम करायला लावणार आणि त्यांना चांगले शिक्षणही उपलब्ध करून देणार..
सौ. गीता वैजनाथ कुंढारे
पालक

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *