
करमाळा प्रतिनिधी
बांधकामधारकांना तसेच घरकुलसाठी कमी दरात वाळू मिळावी आणि वाळू चोरीवर लगाम बसावा यासाठी शासनाने नवीन वाळू धोरण आखले. मात्र, हे वाळू धोरण धाब्यावर मारून वाळूमाफियांचा धुमाकूळ सुरूच आहे. करमाळ्यातील पूर्व भागातील सीना नदीतून दोन, तर उजनी भागात जवळपास सहा ठिकाणी रात्री दहा वाजल्यापासून पहाटेपर्यंत दररोज हजारो ब्रास वाळूवर डल्ला मारला जात आहे. या वाळूमाफियांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

महसूल प्रशासनातील अधिकारी, तसेच ‘खाकी’ आणि ‘खादी’च्या वरदहस्ताने वाळू चोरीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. कारण एरव्ही उसाच्या ओव्हरलोड ट्रॅक्टर ट्रॉलीवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना क्षमतेपेक्षा दुप्पट भरलेला वाळूचा हायवा ट्रक दिसत नाही. तर शेतकऱ्यांच्या मुरुमाच्या गाड्यांवर कारवाई करणारे महसूल अधिकारी वाळूमाफियांवर मेहरबान का, असा सवाल नागरिक करीत आहेत.
इंदापूर, भिगवण, करमाळा या तीन तालुक्यांतील वाळूमाफिया एकत्र आले आहेत. हे माफिया गावपातळीवरील लोकांना हाताशी धरून वाळूच्या चोरीतून लाखोंची माया जमवत आहेत.
बोटीसाठी, वाहतुकीसाठी वेगवेगळे रेटकार्ड ?
बोटीने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून, मोठ्या हायवा ट्रकमधून वाहतूक होत आहे. हायवा ट्रकसाठी व बोटीसाठी वेगवेगळे संबंधित विभागाचे रेटकार्ड ठरले असल्याचे चर्चा आहे. बोटवाल्यांकडून एक लाख, तर ट्रक हायवा ट्रकवाल्यांकडून दीड लाख असे रेटकार्ड आहे, अशी उघड उघड चर्चा नागरिक करीत आहेत. मात्र, याकडे कोणतेही अधिकारी कारवाई करताना दिसत नाहीत.
वाळूमुळे गँगवॉर होण्याची शक्यता ?
वाळूवरून काही दिवसांपूर्वी उजनी काठच्या एका गावात दोन गटांत धारदार शस्त्रांनी मारामारी झाली होती. मात्र, हे प्रकरण जाग्यावरच दडपण्यात आले होते. सध्या वाळू काढण्यासाठी चढाओढ सुरू असून, निवडणुका झाल्यापासून यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कमी कष्टात जास्त पैसे मिळत असल्याने अनेक तरुण यात उतरत आहेत. त्यामुळेच भविष्यात याच वाळूमुळे करमाळा तालुक्यात गँगवॉर घडू शकते, अशी भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे.
पंधरा दिवसांत होते ५० लाखांची उलाढाल ?
वाळूमाफियांकडून एका रात्रीत किमान दहा हायवा ट्रक वाळू काढली जाते. एक हायवा ३० ते ३५ हजारांत विकला जातो. याचा अर्थ रात्रीत तीन ते साडेतीन लाखांची वाळू चोरली जाते. दहा ते पंधरा दिवसांत जवळपास पन्नास लाखांची वाळू विकली जात आहे. असे ही अखेर आरपीआयचे नेते रमेश कांबळे यांनी सांगितले आहे