गांधी जयंती निमित्त दिला सामाजिक एकोप्याचा आणि स्वच्छतेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.2 शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

     सर्वांगीण शिक्षणाचा आग्रह धरणाऱ्या या शाळेत आजही त्याची प्रचिती आली. शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांच्या संकल्पनेतून आज 2 ऑक्टोबर अर्थात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष झेंडे, पोलीस पाटील सलीम मुलाणी, मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे, सहशिक्षक किरण जोगदंड, अंगणवाडी कर्मचारी यांच्या हस्ते या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यावेळी बाळासाहेब बोडखे यांनी या दोन्ही महापुरुषांच्या प्रेरणादायी महान कार्याची माहिती दिली.

    त्यानंतर स्वच्छ्ता मोहिम राबविण्यात आली. त्याची सुरुवात अगोदर वर्ग खोल्या धुऊन करण्यात आली. त्यानंतर हातात स्वच्छ भारत, सुंदर भारत, आपला परिसर स्वच्छ ठेवा असे फलक, झाडू, बादल्या, फरशी पुसण्याचे पोचे घेऊन स्वच्छ्ता विषयक घोषणा, भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जवान जय किसान अशा प्रेरणादायी घोषणा देत प्रभात फेरी काढली आणि त्याद्वारे स्वच्छतेबाबत घोषणा देत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर पाण्यात डेटॉल टाकून हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, पीरसाहेब दर्गा यातील फरश्या पुसून, परिसर झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण गावाला स्वच्छ्तेचा संदेश दिला. यावेळी अध्यक्ष संतोष झेंडे, सरपंच अविनाश मोरे, पोलीस पाटील सलीम मुलाणी, मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे, सहशिक्षक किरण जोगदंड यांनी प्रत्यक्ष झाडू आणि पोचा घेऊन स्वच्छ्ता मोहिमेत योगदान दिले.

      आपले शिक्षक, गावातील सरपंच, शाळेचे अध्यक्ष, पोलीस पाटील हातात झाडू घेऊन स्वच्छ्ता करत आहेत हे पाहून मुलांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला.

        या उपक्रमातून मुलांमध्ये स्वच्छ्ताविषयक जागरूकता आणि सामाजिक एकोपा वाढविण्यास प्रोत्साहन देणे हा उद्देश होता आणि तो नक्कीच सफल झाल्याचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी सांगितले.

    शाळेमध्ये असे संस्कारक्षम, जीवन शिक्षण देत असल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, शि.वि.अ.नितीन कदम, केंद्र प्रमुख महावीर गोरे तसेच समस्त ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि उपशिक्षक किरण जोगदंड यांचे भरभरू कौतुक केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *