
साखरे सर.. साखरे सर म्हटलं कि डोळ्यासमोर उभे राहतात ते अतिशय कडक शिस्त जपणारे, मराठी साहित्य, संत साहित्य, मराठी वांग्मयावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारे हाडामासाचे शिक्षक.डोक्यावर पांढरी शुभ्र गांधी टोपी,डोळ्यावर काळी फ्रेम असणारा चष्मा,हाल्फ शर्ट असलेला सफारी ड्रेस यामध्ये उंच शरीरयष्टी असलेलं अमोघ व्यक्तीमत्व.

लहानपणीचं आईच मायेच छत्र गमावल्यानंतर अतिशय हालाकीच्या परिस्थितीतुन मार्ग काढत नानांनी राजुरीत सातवीपर्यंत, कोर्टीच्या छत्रपती विद्यालयामध्ये दहावीपर्यंत, नंतर बी ए पर्यंतचे शिक्षण करमाळ्यामध्ये आणि नंतर b.ed चे शिक्षण सोलापूर मध्ये घेतले.सातवी नंतर कोर्टी येथे शाळेसाठी जायला बस ची सोय नसल्याने त्याचबरोबर सायकल घेण्याची परिस्थिती नसल्याने नाना पायी चालत शाळेसाठी कोर्टीला जायचे विशेष म्हणजे आठवी ते दहावी पर्यंतच्या संपूर्ण तीन वर्षाच्या काळात नाना एकदाही शाळेला शाळेच्या वेळेच्या उशिरा गेले नाहीत. (यावेळी नानाची शिक्षणाप्रती असलेली जिद्ध चिकाटी पाहून मांजरगाव येथील कै. साहेबराव(अण्णा )पाटील यांनी नानांना आपली स्वतःची सायकल शाळेत जाण्यायेण्यासाठी दिली होती हे नाना वेळोवेळी बोलताना सांगायचे.)करमाळा मध्ये देखील कमवा आणि शिका या योजने अंतर्गत काम करून नाना शिकत होते. त्यानंतर b.ed करताना एक वेळ बीएड चे ऍडमिशन घेण्यासाठी मुंबई येथे बोलावून एका व्यक्तीकडून नानांची फसवणूक झाली होती,त्यावेळी हातातील घड्याळ तसेच b.ed च्या ऍडमिशन साठी जमा केलेलं पैसे घेऊन त्यांना त्या व्यक्तीने घालवून दिले होते. परत भरण्यासाठी पैसे नसल्याने दावणीचा एक बैल विकून आलेल्या पैश्यातून b.ed साठी ऍडमिशन घेतले होते.

मराठी विषयात बीए बीएड पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८१ साली जगताप सर,श्रीधर काका कुलकर्णी आदी मंडळींनी एकत्रितपणे प्रयत्न करून राजुरी येथे गावातील तसेच पंचक्रोशीतील विध्यार्थ्यांना विशेषतः मुलींना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या हेतूने श्री वैजनाथ स्वामी सेवा मंडळाचे श्री राजेश्वर विद्यालय राजुरी या नावाने हायस्कूल सुरु केले. या राजेश्वर विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक म्हणून नानांनी काम पाहिले. कामावर रुजू होताना मुख्याध्यापक ते कामावरून निवृत्त होतानाही मुख्याध्यापक असा दुर्मिळ योग नानांच्या शिवाय इतर कोणाच्याही नशिबात नसावा. राजेश्वर विद्यालयाच्या स्थापनेनंतर शाळेला अनुदान मिळेपर्यंत जवळपास ७ वर्षे नानांनी पूर्णपणे कोणताही मोबदला न घेता सेवा केली होती. विनाअनुदानित शाळा चालवत असताना राजुरी आणि पंचक्रोशीतील गावात धान्य स्वरूपात मदत मिळवण्यासाठी नाना स्वतः मुख्याध्यापक असतानाही विध्यार्थ्यांना सोबत घेऊन गावोगावी हिंडत असताना आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं असेल. मुख्याध्यापक असताना सुरवातीच्या काळात कितीतरी वेळा मुख्याध्यापक-शिक्षक -शिपाई या तिहेरी भूमिका पार पाडण्याचं काम नाना करत होते. हे करत असताना त्यांनी कधीही कोणता कमीपणा वाटून घेतला नाही. एखाद्या शाळेचा मुख्याध्यापक किती शिस्तप्रिय असावा शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिस्तीची सवय कशी लावावी याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नाना होते.
नानांनी आपल्या तिन्ही मुलींना आणि मुलाला ज्या पद्धतीने शिक्षण आणि चांगले संस्कार दिले. त्याच पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि योग्य संस्कार देण्याचं काम केले. हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरचं अडचणीच्या काळात त्या विद्यार्थ्यांच्या सोबत राहण्याचं काम नाना करत होते. (उदाहरणच द्यायचं झालं तर सावडी येथील कुलकर्णी नावाचा विद्यार्थी बोर्डामध्ये पहिला आला असता परंतु पेपर तपासणीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने पेपर तपासल्यामुळे या विद्यार्थ्याला भाषेच्या कोणत्यातरी विषयांमध्ये कमी गुण दिले होते.त्यावेळी पुणे विद्यापीठामध्ये नानांनी खूप प्रयत्न करून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच मांजरगावचे चौधरीसर यांना दहावीनंतर शाहीरच व्हायचं होतं त्यावेळी घरच्या लोकांना समजावून नाना स्वतः चौधरी सरांना घेऊन प्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे घेऊन गेले होते.) कडक शिस्तीच्या नानांचा विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांमध्ये देखील आदरयुक्त शिस्तीचा दबदबा होता.
मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर कडक शिस्तीचे नाना आपल्या शेतीवाडीत मन लावून काम करायचे तसेच आपल्या मुलींच्या आणि मुलाच्या नातवंडमध्ये लहान लेकरू होऊन रमुन जाताना मी अनेकदा पाहिलं आहे. कुटुंबवत्सल नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या दोन्ही मोठ्या भावांसोबत म्हणजेच अप्पा आणि अण्णा सोबत कधीही संवाद तुटू दिला नाही किंवा घरातील एकी,प्रेम,माया,आपुलकी तुटू दिली नाही.नानांनी घडवलेले शाळेचे माजी विध्यार्थी नानांना भेटायला घरी आल्यानंतर त्या विद्यार्थ्याला त्याच्या संपूर्ण नावाने ओळखत असत तसेच आपुलकीने त्याची चौकशी करत असत. खरं तर शाळेतील कडक शिस्तीमुळे शक्यतो नानांच्या समोर जायची हिंमत माझी अजूनही होत नव्हती. कधी मेडिकल मध्ये आल्यावर घरी येत नाही, बोलत नाही म्हणून नाना माझ्यावर रागवायचेदेखील तरीही का कोणास ठाऊक समोर जाऊन नानांना बोलण माझ्यासह अनेकांना जमलं नाहीच.
गावातील कोणत्याही सामाजिक प्रश्नाचं शेवटचं उत्तरं नाना असायचे. कोणाचं लग्न जमवायचं असेल, कोणाचा घरगुती वाद असेल एखादा सामाजिक कार्य असेल यामध्ये नानांचा शब्द अंतिम असायचा. पारमार्थिक क्षेत्रात देखील नानांचा वावर असायचा श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची पुण्यतिथी नाना मोठ्या आत्मीयतेने साजरी करायचे, तसेच श्री वैजनाथ स्वामी महाराजांच्या आषाढी उत्सवात फराळाची पंगत नानांची असायची. विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा,जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचा तसेच इतर सर्वच संताच्या साहित्याचा तसेच महाभारत रामायणाचा नानांना गाढा अभ्यास होता.
नानाचं मराठी भाषेवर प्रभूत्व होतं. नाना बोलत असताना साक्षात सरस्वती देवी नानांच्या जिभेवर नांदत असल्याच आपल्यापैकी प्रत्येकाने अगदी अंतःकाळापर्यंत पाहिलं आहे.एखाद्या व्यक्तीवर श्रद्धांजली पर बोलत असताना त्या व्यक्तीला न पाहणाऱ्यालादेखील ऐकणाऱ्याला त्याच्या संपूर्ण जडघडणीचा उलगडा होतं असे. म्हणूनच दोन पिढ्याना जोडणारा एक अतूट सेतू मात्र आज आपल्यात नाही याची मनोमन खंत वाटते.
गुरुवर्य हभप निवृत्ती(दादा)महाराज हंडे राजूरकर यांच्यावर नानांची अपार श्रद्धा होती. हंडे घराणं आपलं गुरुघरानं आहे त्यांच्यावर असणाऱ्या निष्ठेला तडा जाऊ देऊ नका असं देखील नाना नेहमी सांगत असत.अंतकाळी आपल्या गुरु घराण्याचे म्हणजेच हभप एकनाथ महाराज हंडे यांचे दर्शन घेऊनच नानांनी आपला देह ठेवला असल्याने नानांना पांडुरंग परमात्म्याने त्याचा पायाजवळ जागा देऊन नानांचा जन्म मरणाचा फेरा बंद करून मोक्षचं दिला आहे.
जाता जाता इतकंच सांगावस वाटत याजसाठी केला होता अट्टाहास.. शेवटचा दिस गोड व्हावा.
आणि
तुका म्हणे एका मरणेची सरे..उत्तमची उरे कीर्ती मागे.
–श्रीकांत साखरे.