
*स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये गुरू पौर्णिमा साजरी*
करमाळा प्रतिनिधी
आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते.

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल करमाळा येथे उत्साही वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम पालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. गुरुवंदना करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व पालकांनीही आपले मत व्यक्त केले. यावेळी सौ.हेळकर मॅडम यांनी अतिशय सुंदर आवाजात गीत गायन केले. यानंतर सविता शहा यांनी गुरु शिष्याची गोष्ट सांगितली. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला गुरु भेटतात. आपले आई-वडील आपले शिक्षक तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सर्वजण आपणासाठी गुरु असतात. त्या गुरूंविषयी असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या प्रसंगी गरड मॅडम व महामुनी मॅडम यांनीही सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या . सौ. माकुडे यांनी गुरूंना आदर देणे किती महत्त्वाचे आहे याविषयी सांगितले . ध्येयापर्यंत नेण्यासाठी मार्गदर्शन करणारा हा गुरुच असतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खळदकर मॅडम यांनी केले . हा कार्यक्रम स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ धनश्री दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
