
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरासह तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे मागील आठवड्यात साडे, घोटी, सौंदे, वरकटणे परिसरात घरफोड्याचे प्रकार घडले असून लाखो रुपये चोरट्यांनी ढापले आहेत, दर शुक्रवारी बाजार दिवशी अनेकांचे मोबाईल, पाकिट यावर चोरटे हात साफ करत आहेत.

काल गुरुवार दि. १८ रोजी चोरट्यांनी भरदिवसा करमाळा बस स्थानकावर बस मध्ये चढताना हिवरे ता. करमाळा येथील सुगंधा तात्याबा जगताप (वय ६५) या महिलेचे सव्वा तोळ्याचा गंठण हातोहात लंपास केला आहे. हा प्रकार दुपारी दोन ते अडीच च्या दरम्यान घडला आहे. सुगंधा जगताप या हिवरे येथे परितक्ता जिवन जगत आहेत खुरपन रोजंदारी वर काम करून भविष्यातील उदरनिर्वाह साठी गुंतवणूक म्हणून त्यानी सव्वा तोळ्याचे गंठण केले होते. यावर चोरट्यानी हात मारल्याने सुगंधा जगताप यांची चार वर्षाची पुंजी गायब झाली आहे.

चौकट
करमाळा तालुक्यात चोरीच्या घटनात वाढ होत आहे. बाजार दिवशी अनेकांचे मोबाईल, खिसे मारले जातात. पोलीसांकडून सहकार्य होत नसल्याने लोक गुन्हा दाखल करायला देखील जात नाहीत हि वस्तुस्थिती आहे. बस स्थानकावर सिसिटिव्ही असून देखील चोरी करण्याचे चोरट्यांचे धाडस कसे होते, सिसिटिव्ही फुटेज तपासून गंठण चोरीचा तपास केला जावा तरच अशा घटनांना आळा बसेल अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
