
करमाळा प्रतिनिधी
महावितरण चे विभागीय कार्यालय करमाळा येथे तातडीने वीज ग्राहकांच्या सोयीसाठी स्थापित करण्याबाबत विनंती पत्र भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका नेत्या रश्मी दिदी बागल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच दिले असून याबाबत सकारात्मक कार्यवाही आगामी कालावधीमध्ये होईल अशी माहिती आज

भाजपाचे सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी बोलताना दिली. यावेळी अधिक माहिती देताना बागल म्हणाले की, अनेक वर्षापासून बार्शी येथे महावितरणचे विभागीय कार्यालय आहे. करमाळा तालुक्याचे महावितरणचे कार्यालय बार्शी येथील विभागीय कार्यालयाच्या अधिनस्त येते, परंतु करमाळा तालुक्याच्या पश्चिम

भागापासून भौगोलिक दृष्ट्या बार्शी हे खूप दूरच्या अंतरावर आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना त्यांच्या समस्या व कामासाठी बार्शीला जाणे गैरसोयीचे आहे. तसेच करमाळा तालुक्यात उजनी, सिना कोळगाव, कुकडी व इतर प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीपंपांना आवश्यक असणाऱ्या मागणी वाढली आहे. विजेच्या तारा पोल डीपी या साहित्याकरता बार्शीला जाणे क्रमप्राप्त

असते, नादुरुस्त अथवा जळालेल्या डीपी व नवीन डीपी करता बार्शी विभागीय कार्यालयाकडूनच या डीपीचा पुरवठा होतो. बार्शी हा विभाग भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा असल्याने व अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यास विलंब होतो, त्यामुळे वीज ग्राहकांना सुरळीत व अखंडपणे वीजपुरवठा होऊ शकत नाही, त्यामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने व विज ग्राहकांच्या हितासाठी करमाळा येथे विभागीय कार्यालय करण्यात यावे या मागणीसाठी पश्चिम भागातील ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे, दत्तात्रय गायकवाड, काशिनाथ दादा काकडे, आशिष गायकवाड, पप्पू गुळवे देविदास सांळुके, गोरख भोगे, आदी शिष्टमंडळाने रश्मीदिदी बागल यांना निवेदन देऊन विनंती केली होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करून रश्मी दीदी बागल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नेते देवेंद्र फडणवीस यांना करमाळा येथे महावितरणचे विभागीय कार्यालय स्थापित करणे बाबत विनंती पत्र दिले आहे. करमाळा विभागीय कार्यालय झाल्यास या कार्यालयाला जेऊर टेंभुर्णी कुर्डूवाडी करमाळा हे उपविभाग तसेच करमाळा शहर व पारेवाडी उपविभाग हे दोन नव्याने उपविभाग केल्यास वीज ग्राहकांच्या अनेक समस्या सुटू शकतील व प्रशासनाच्या दृष्टीने व ग्राहकांच्या सोयीसाठी करमाळा विभागीय कार्यालय होने गरजेचे असल्याचे रश्मी दिदी बागल यांनी फडणवीस यांना निदर्शनाला आणून दिले आहे. याबाबत लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल, अशी आशा शेवटी दिग्विजय बागल यांनी व्यक्त केली.