नदीकाठी कोप्यात राहणारी मुलं पहिल्याच दिवशी चारचाकीन शाळेत दाखल..

खातगाव शाळेत नवगतांचे जोरदार मिरवणूक काढून स्वागत

करमाळा प्रतिनिधी

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.2 या शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सजवलेल्या चार चाकी गाड्यांमधून नव्याने शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.

   उजनी धरणाकाठी, दुर्गम भागामध्ये असणारे खातगाव नं.2 हे गाव. येथे वाहतुकीची कसलीही सोय नाही. या शाळेमध्ये जास्त करून मुलं मच्छिमार, शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील आहेत. खातगाव हे गाव पुनर्वशीत असल्याने जादा तर ही कुटुंब शाळेपासून दूर अंतरावर नदीकाठी, शेतामध्ये वस्ती करून राहतात.

     शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी पुढाकार घेऊन आपले सहकारी शिक्षक किरण जोगदंड यांच्या मदतीने या चार चाकी गाड्यांची सजावट केली आणि थेट नदीकाठी विद्यार्थ्यांची वस्ती गाठली. चिखलातून वाट काढत या विद्यार्थ्यांना सन्मानाने शाळेत आणले. तसेच गावातील वेगवेगळ्या भागातून नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा या मिरवणुकीमध्ये समावेश होता. गावातील शिक्षण प्रेमी नागरिक, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, महिला वर्ग आणि शाळेचे विद्यार्थी या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. झाडे लावा झाडे जगवा, चला चला शाळेत चला, मुलगी शिकली प्रगती झाली अशा वेगवेगळ्या शैक्षणिक आणि पर्यावरण विषयक घोषणा देत या विद्यार्थ्यांची काढलेली ही मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

    शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना या सर्व मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प, फुगे, पुस्तके आणि मिठाई देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आपल्या लेकरांचे पहिल्याच दिवशी होत असलेले कौतुक पाहून पालकांनाही खूप आनंद झाला.

    शाळेमध्ये पहिल्या दिवशी असा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रभावीरीत्या आणि धुमधडाक्यात साजरा केल्याबद्दल करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलावडे, कदम, जिंती केंद्राचे केंद्रप्रमुख महावीर गोरे, गावातील ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, महिलावर्ग सर्वांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि उपशिक्षक किरण जोगदंड यांचे भरभरून कौतुक केले आणि नवीन वर्षाच्या प्रभावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *