
करमाळा प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून करमाळा शहर आणि परिसरात अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या होत असताना त्यांचा तपास काही केल्या लागत नव्हता, चोर सापडत नव्हते.

आज सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान बायपास रोड, कृष्णाजी नगर येथे एक चोरीची घटना झाली. चोरट्यांनी चोरी केल्यानंतर ते देवीचा माळ पायथ्याकडे पळून गेले. ते तिथेच काही दिवसांपासून पाल टाकून रहात होते. युवा नेते शंभूराजे जगताप यांनी मोठ्या धाडसाने पाठलाग करून ते चोरटे पकडले व एवढ्यावरच न थांबता त्या सगळ्यांना एका टेंपोत बसवून तो टेंपो थेट पोलीस स्टेशन मध्थे आणला. या गोंधळात काही लोक पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर पोलीस स्टेशन येथे मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले.

यावेळी शंभूराजेंनी पोलीस स्टेशनच्या कारभाराचे जाहीर पोस्ट मार्टेम केले. काही दिवसांपूर्वीच शहरातील एका युवकाने आत्महत्या केली होती त्याचा साधा गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीसांनी तब्बल १२ दिवस का लावले ? डिवायएसपी यांना मी स्वतः १६ काॅल लावले पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. अश्याने गुन्हेगारांवर वचक राहिल का ? चोरीला गेलेल्या मोबाईलची चोरीची तक्रार दाखल न करता गहाळ झाल्याची तक्रार का घेतात ? सहज तपास लावता येईल अश्या मोबाईल चोरांवर का कारवाई केली नाही ? एका व्यक्तीच्या घरातून १३ लाखांहून अधिक रकमेची चोरी झाली होती त्या तपासाचे काय झाले ? चोरीची तक्रार देण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टर मालकाला सहा दिवस हेलपाटे का मारायला लावले ? एखाद्या आपात्कालीन परिस्थितीत अधिकाऱ्यांना फोन लावला तर अधिकारी फोन घेत नाहीत याउलट वाळू आणि इतर ठिकाणी हफ्ते गोळा करायला मात्र वेळेवर कसे काय पोहोचतात ? अश्या प्रश्नांनी शंभूराजेंनी तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना निरुत्तर केले.

चोरट्यांचा धाडसाने पाठलाग करून त्यांना पकडून थेट पोलीसांच्या ताब्यात देण्याच्या या धाडसाबद्दल युवा नेते शंभूराजे जगताप यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. जे काम पोलीसांनी करायला पाहिजे ते काम शंभूराजे जगताप यांनी मोठ्या धाडसाने केले आहे हे मात्र खरोखरच उल्लेखनीय आहे.