
करमाळा प्रतिनिधी
पुस्तक – आंब्यावाणी व्हता गाव
कवी – हरिभाऊ हिरडे.पोथरे करमाळा.जि.सोलापूर. ८८८८१४८०८३
प्रकाशक – यशोदीप पब्लिकेशन पुणे ३०.
मूल्य – ४८



साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर यांची प्रस्तावना लाभलेला “आंब्यावाणी व्हता गाव” हा हरिभाऊ हिरडे यांचा काव्यसंग्रह हाती पडला. कवितांचं सुसाट वाचन तेव्हाच होतं जेव्हा त्या काळजाला भिडतात. ९६ पानाचं ५८ कविता असलेलं पुस्तक एका बैठकीत मी वाचून काढलं. कविता मनाचा ठाव घेतात आणि का नाही घेणार ? कारण कवी स्वतः शेतात राबतो आहे. जगणारे नोंदी ठेवतात तेव्हा खरं काव्य कागदावर उतरतं. रोजचं जगणं कवी आपल्या शब्दांत मांडतोय तेव्हा कवितेचं मोल अधिक ठळक आणि गडद होतंय हे जाणवतं. हे नव्यानं सांगायला आवडेल.

सुरुवातच आईच्या कवितेनं व्हावी यापेक्षा आणखीन काय श्रेष्ठ ते असेल? “आई महातीर्थ आहे “असं कवितेतून मांडताना कवींनं खूप मोलाचा संदेश आपल्या आजच्या पिढी पुढं ठेवला आहे. “आंब्यावाणी व्हता गाव” हे शिर्षक असलेली कविता शेतकऱ्यांच्या दयनीय आयुष्यावर भाष्य करते. शेतकऱ्यांच्या जीवनातलं भयान वास्तव या कवितेत मांडून कवींनं आजच्या व्यवस्थेवर बोट ठेवलं आहे.

उसा – कापसासकट गाव गेलं चरख्यात
वेष घेवोनी कसाई फिरत्याती गुराख्यात
बळीराजाच्या हिरव्या आयुष्याचं भयान वास्तवात रुपांतर करायला आजची व्यवस्था जबाबदार आहे.

कवितेतील एकेक शब्द काळजाचा ठाव घेतोय नक्कीच. शेवटच्या कडव्यात कवी समाजाला, नव्या पिढीला सांगू पहातोय की शहरातल्या लोकांनी गावं पून्हा पूजावी. मन सुन्न करणारे हे शब्द आणि ही कविता समाज मनापर्यंत पोहचायला हवी खरंच.

रक्तचंदन, पिकू दे विठ्ठला, करंडा, मुंग्या नांदतात अशा कितीतरी कवितेतून कवीनं शब्दांच्या माध्यमातून संवाद साधलाय. हा संवाद साधासुधा निश्चितच नाही कारण कवितांना एक अस्सल असा दर्जा आहे. म्हणून त्या कविता आपल्या वाटतात. जात, धर्म, पंथ विसरायला लावतात म्हणून त्या उच्च कोटीच्या वाटतात.

इथं सारं शिवार धुवून खाल्लं रानगव्याने
तरी पेटत नाहीत आमच्या खांद्यावरचे आसूड
खूप सोसल्या नंतरच असे शब्द बाहेर पडत असावेत निश्चितच.
देवळे आणि पुतळे कवितेचा आशयगर्भ गावशहर, देवळे, पुतळेच्या अवतीभवती घुटमळत जरी असला तरी कोणत्या दिशेला जोडावेत हात असा प्रश्न कवीला पडतो आहे. शहराचा उजेड सहन होत नाही डोळ्यांना असंही कवी म्हणून जातो आणि शेवटी माझं गाव, आणि पडक्या देवळातला दगडी दिवा जो जळतो आहे अखंडपणे न भडकता याची आठवण कवीला होते आणि हे सगळं वाचताना डोळ्यात आपसूकच पाणी तरळते.
गावाखेड्यातला कम्मालीचा भाव, ती संवेदनशीलता व्यक्तिपरत्वे भिन्न असेल ही कदाचित पण हरिभाऊ हिरडे हे सारं मा़ंडण्यात अगदी यशस्वी झालेत. गावाकडची ओढ त्यांच्या कवितेचा गाभा आहे. या गोष्टी कवितेतून मांडायला वाटतं तितक्या सोप्या नसतात. त्या इतक्या सहजतेनं मांडल्या गेल्या कारण त्या रोजच्या जगण्यातल्या त्या गोष्टी आहेत. या आणि याच कारणामुळे कविता उठावदार झाल्या आहेत. एका कवितेनं तर कहर केला. खूप वजनदार आणि भारी वाटली कविता. बापाची कविता..भारीच वाटणार अगदी कोणालाही.
लोखंडाचा बाप.. इथं आख्खी कविता मांडते.
लोखंडाच्या नांगराने
नांगरट करणारा बापही
होता लोखंडाचाच
पण
नांगरटीच्या कोणत्याच वळणावर
त्याला भेटला नाही
कुठलाच परीस
आणि माती, ढेकळात गंजून गेला
लोखंडाचा बाप…
शेतकरी गीत, पूर्वजांची गेली पिढी, गावची पायवाट थोर अन्नदाता अशा अनेक कविता समाजभान जपणा-या, नव्या आशयासह भेटतात.
घुंगर माळ आणि वासरू ही कविता गाय मातीआड गेल्यावर वासराची होणारी तडफड काळीज चिरफाड करुन टाकते. इतकी संवेदनशीलता अस्सल मराठमोळ्या कवीच्या मनातच असू शकते.
ओघळणारी आसवं पुसत पुसतच प्रत्येकजण ही कविता वाचेल असे वाटते.
काव्यात कुठलाच वाद नाही, उगीचच मोठ्ठाले शब्द नाहीत, साधी सोपी ओघवती भाषा मनाला भुरळ पाडून जाते.
शहराच्या तुलनेत आज गावची दशा चोखून टाकलेल्या कोयी सारखी झाली आहे. एकेकाळी “आंब्यावाणी व्हता गाव” ही खंत कवीला अस्वस्थ करते. म्हणूनच हे शिर्षक समर्पक वाटते.
हा काव्यसंग्रह कल्पनाप्रधान मुळीच नाही तर शेतकऱ्यांशी, ग्रामीण भागातील जीवन जगणा-या त्या प्रत्येक जीवाशी आपसूक नाते सांगणारा यथार्थवादी काव्यसंग्रह आहे.
यातील प्रत्येक कविता ही माझी कविता आहे असे प्रत्येक वाचकाला वाटावे इतपत हा काव्यसंग्रह श्रेष्ठ ठरणार आहे यात शंका ती कसली ?
मराठी काव्य जग खूप व्यापक, अफाट आहे. पण त्यातही मातीशी ईमान राखणारे कविवर्य हरिभाऊ हिरडे आपल्या कवितांच्या माध्यमातून आपली एक ओळख समाज मनावर अलगद सोडतील हा आशावाद जपायला काही हरकत नाही.
वाचून, विसरुन जाव्यात अशा या कविता नाहीत तर या कविता मनात घर करून राहतात. विचार करायला भाग पाडतात.
पोटतिडकीनं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हाती घेतलेल्या आसूडाला, गावाकडच्या व्यथांना, बांधावरच्या कवितांना, लेखणीच्या नांगरटीला पुन्हा एकदा मनभरुन शुभेच्छा.
धन्यवाद.
अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा. ७७०९४६४६५३
shrivastavanjalis053@gmail.com