देवळाली ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंच पदी अश्विनी धनंजय शिंदे यांची निवड
करमाळा प्रतिनिधी
देवळाली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अश्विनी धनंजय शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यापूर्वीचे सरपंच गहिनीनाथ रामा गणेशकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सदरील सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची देवळाली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निवड करण्यात आली.


सदरील निवडी प्रसंगी देवळाली ग्रामपंचायत सदस्य मंदाकिनी रामा कानगुडे, गहीणीनाथ रामा गणेशकर, आश्विनी धनंजय शिंदे, आशिष कल्याण गायकवाड, पोपट विष्णू बोराडे, नर्मदा बबन कानगुडे, सविता संजय चौधरी इत्यादी सदस्य उपस्थित होते. देवळाली ग्रामपंचायतीमध्ये 13 सदस्य आहेत. त्यातील सात सदस्य उपस्थित तर सहा सदस्य गैरहजर होते. सदरच्या

सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी गुरुवार दि. 18 जानेवारी रोजी दुपारच्या दोन वाजेपर्यंत शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आर. एच. राऊत यांनी, शिंदे यांना देवळाली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निवड घोषित केली. या निवडीनंतर उपस्थित समर्थकांनी मोठा जल्लोष करत, ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये फटाके फोडत, गुलाल उधळत तसेच देवळाली येथील ग्रामदैवत नागनाथ महाराजांच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढत, तेथे सर्वांनी पुष्पहार अर्पण करत नारळ फोडून दर्शन घेतले.


सदरील सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ग्रामविकास अधिकारी नागरसे एस. एम., तलाठी शितल सूर्यवंशी देवळाली ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र चौधरी, मच्छिंद्र गायकवाड, काळू दामोदरे, रेवणनाथ मोरे, धनंजय शिंदे इत्यादींनी उपस्थित राहून ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सर्व सहकार्य केले. यावेळी सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी करमाळा पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत सदरील ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *