
विहाळ येथील तलावात प्रथमच कुकडीचे पाणी दाखल – आमदार संजयमामा शिंदे
प्रतिनिधी
कुकडी प्रकल्प हा 7 तालुक्यांसाठी असून त्यामध्ये करमाळा हा टेलचा तालुका आहे. करमाळा तालुक्याला कुकडी प्रकल्पाचे 5.50 टीएमसी पाणी मंजूर असले तरी प्रत्यक्षात या प्रकल्पातील कॅनॉलची अनेक कामे रखडलेली असल्यामुळे कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व गावांमध्ये अद्यापही कुकडीचे पाणी दाखल झालेले नव्हते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांनी कुकडी प्रकल्प अंतर्गत येणारी पोंधवडी या चारीचे काम पूर्ण करून या चारीवरील गावांना आपण पाणी देऊ असे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्ती आ. संजयमामा शिंदे यांच्याकडून झाल्यामुळे विहाळ तलावात प्रथमच कुकडीचे पाणी दाखल झाले. चारीचे उर्वरित काम झाल्यानंतर इतर गावांना पाणी मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

कुकडी डावा कालवा अंतर्गत पोंधवडी शाखा कालवा- हुलगेवाडी चारीचा शुभारंभ गतवर्षी आ. संजयमामा शिंदे यांच्या शुभ हस्ते व मा.आ.जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला होता. मागील 3 पंचवार्षिक योजनेत या कामासाठी पुरेसा निधी मिळत नव्हता त्यामुळे हे काम रखडले होते. संजयमामा शिंदे आमदार झाल्यानंतर शासन दरबारी सतत पाठपुरावा करून 9 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर करून काम सुरू केले होते.

दि. 18 मार्च 2023 रोजी या चारीतून पाणी बाहेर पडून नजिकच्या विहाळच्या तलावात सोडण्यात आले. भविष्यात, याच चारीतून गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या कोर्टी, गोरेवाडी, हुलगेवाडी, कुस्करवाडी, पोंधवडी, राजुरी, विहाळ, वीट, अंजनडोह, सोगांव, मांजरगाव गावातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. आमदार संजय मामा शिंदे यांची यांची वचनपूर्ती अर्थाने आज पूर्ण होत आहे. नागरिकांमध्ये यामुळे समाधानाचे वातावरण दिसत आहे.
