
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील वीट हद्दीतून चोरीस गेलेला ट्रॅक्टर व त्याला जोडलेला पाळीचा मोगडा असा एकूण ₹३ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल करमाळा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेऊन चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

वीट हद्दीतील शेतगट क्रमांक ६९३ मधील पत्र्याच्या शेडमध्ये लावलेला सोनालिका कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर चोरीस गेला होता. या ट्रॅक्टरची किंमत ₹३ लाख ५० हजार असून, त्याला जोडलेला पाळीचा मोगडा ₹२५ हजार किमतीचा आहे.

या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीचा ट्रॅक्टर व पाळीचा मोगडा हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा डी.एस. आणि करमाळा पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोफौ हनुमंत जाधव करीत आहेत.