
करमाळा प्रतिनिधी
मांगी ता. करमाळा येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद केला गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत असून याबाबत निश्चितपणे समाधानकारक तोडगा मंत्रालयीन पातळीवर काढावा अशी विनंती केली असल्याचे भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्षा रश्मी दीदी बागल यांनी सांगितले. याबाबत अधिक बोलताना रश्मी दीदी बागल म्हणाल्या की, सध्या करमाळा तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील सहा तलावांसह मांगी तलाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या खाजगी विहीर व बोअर यांचा महावितरणकडून वीजपुरवठा सरसकट बंद केला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके ही जळत चालली असून नुकसान होण्याची भीती आहे. याबाबत सध्या तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू असून यातून समाधानकारक तोडगा काढावा असे राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या समोर वस्तुस्थिती मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने मंत्रालयीन पातळीवर निश्चित प्रयत्न करू असे रश्मी बागल यावेळी म्हणाल्या.

सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे परंतु शेतकऱ्यांची सध्याच्या उभ्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. उत्तर वडगाव, दक्षिण वडगाव, जातेगाव,पुनवर,मांगी,हिवरवाडी, यासह मांगी तलावावरील लाभार्थी शेतकऱ्यांना हा निर्णय निश्चितपणे नुकसानकारक ठरणार आहे. ही वस्तुस्थिती निश्चितपणे मंत्रालयीन पातळीवर मांडून व भ्रमणध्वनी द्वारे शेतकऱ्यांची व्यथा मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासंदर्भात यातून समाधानकारक तोडगा काढावा अशी विनंती भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्ष रश्मी दीदी बागल यांनी केली.