तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यपाल यांच्या कार्यालयासमोर आणि मंत्रालयासमोर आंदोलन करणार ! म.वि.से

सोलापूर प्रतिनिधी
करमाळा तहसील कार्यालयातील महिला मंडळ अधिकाऱ्याचा विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल असलेले आरोपी मंडळ अधिकारी राजकुमार पांडेकर आणि तलाठी गोरक्षनाथ ढोकणे यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवाजी शिंदे,चेतन साठे, रोहन साठे, विकी केसकर,सैलानी सय्यद,माऊली शिंदे, हरिदास लोंढे,कय्युम शेख,रोहन पाटील, अक्षय क्षीरसागर, महेश शिंदे,कानिफनाथ अवघडे, भैरू अवघडे उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर

जिल्हाधिकारी यांची महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. भेटीदरम्यान कायदेशीर तरतुदींचा दाखला देत, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील भाग दोन, नियम ४(१)(क) नुसार आरोपींवर फौजदारी गुन्ह्याशी संबंधित अन्वेषण आणि चौकशी सुरू असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी कायदेशीर तरतूद तपासून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. संबंधित मंडलाधिकारी व तलाठी यांच्यावर दोन दिवसांत कारवाई न झाल्यास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, महसूल मंत्री, महसूल अप्पर मुख्य सचिव आणि विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा आक्रमक इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र, इतका गंभीर गुन्हा दाखल होऊनही आणि थेट कायदेशीर नियमांचा आधार समोर असतानाही प्रशासनाकडून आरोपींना तात्काळ निलंबित करण्यात आलेले नाही.

जबाबदार पदावर असलेल्या महिला अधिकाऱ्यासोबत शासकीय कार्यालयातच असा निंदनीय आणि भयानक प्रकार घडल्यामुळे संपूर्ण महसूल विभागाची मान खाली गेली आहे. इतके दिवस उलटूनही प्रशासन या वादग्रस्त मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला पाठीशी घालत असल्याचा संशय आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या ढिसाळ आणि संशयास्पद भूमिकेमुळे सध्या जनतेमध्ये उलट-सुलट चर्चांना उधाण आले असून, प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष माने,शहराध्यक्ष गोविंद बंदपट्टे यांनी पाठिंबा दिला.