“विमा कंपनीने मनसेला हलक्यात घेऊ नये” — संजय (बापू) घोलप

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा १०० टक्के पीक विमा परतावा मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, करमाळा तालुका व शहर यांच्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची पूर्ण नुकसानभरपाई मिळावी, तसेच विमा कंपन्या व संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी बोलताना मनसे तालुकाध्यक्ष संजय (बापू) घोलप यांनी पीक विम्याच्या प्रश्नावर मनसे आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सांगितले. “शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विम्याबाबत विमा कंपनीने मनसेला हलक्यात घेऊ नये. शेतकऱ्यांना योग्य आणि पूर्ण विमा परतावा मिळेपर्यंत या प्रश्नाचा पाठपुरावा सुरूच राहील,” असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संतोष वारे, संजय चोपडे, विहाळचे उपसरपंच प्रदीप हाके, पोथवडीचे सरपंच मनोहर कोढलिंगे, नेरले येथील नेते औदुंबर राजे भोसले, अमोल कोढलिंगे यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना पीक विम्याचा योग्य व पूर्ण लाभ मिळावा, यासाठी प्रशासन तसेच संबंधित विमा कंपनीकडे पुढील काळातही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *